संतोष भिसे
सांगली : पुणे ते बंगळुरू प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी प्रस्तावित ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला गती मिळत असल्याचे चित्र आहे.
केंद्र सरकारच्या पातळीवर या महत्त्वाकांक्षी योजनेला अंतिम मान्यता मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. देशभरातील २५ हरित महामार्गाच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे.
महामार्गाच्या आराखड्याला महिनाभरात मंजुरीची अपेक्षा आहे. त्यानंतर भूसंपादनासह पुढील कामे सुरू होणार आहेत. या प्रकल्पामुळे पुणे बंगळुरु हा सध्या १४-१५ तासांचा प्रवास केवळ सात तासांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच या महामार्गाचा आढावा घेतला. सध्या अस्तित्वातील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर वाहतूक खूपच वाढली आहे.
अतिक्रमणे, अरुंद मार्ग आणि अपघातांमुळे प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे नव्या मार्गाची प्रवाशांना प्रतीक्षा आहे.
तो पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमधून पुढे कर्नाटकातील बेळगावी, बागलकोट, गदग, विजयनगर, दावणगेरे, चित्रदुर्ग आणि तुमकूर मार्गे बंगळुरूपर्यंत जाणार आहे.
कांजळे-खोपेगाव येथील प्रस्तावित रिंग रोडला या महामार्गाची जोड देण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे-बंगळुरू औद्योगिक कॉरिडॉरला बळ मिळेल अशी अपेक्षा आहे.
या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्राकडे अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने भूसंपादन प्रक्रिया सुरू केली जाईल.
जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गासाठी आरेखन, भूसंपादन ही प्रक्रिया गतीने सुरु असल्याच्या काळात बहुप्रतीक्षित ग्रीनफिल्ड कधी मार्गी लागणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते. तो आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्यासाठी भूसंपादनही सुरू होणार आहे.
सुमारे २० हजार एकर जमीन संपादनाची गरज
महामार्ग भारतमाला परियोजनेंतर्गत आहे. सुमारे ७०० किलोमीटर लांबीचा हा दुतगती महामार्ग सहा पदरी व काही ठिकाणी आठ पदरी आहे. सुमारे ४५ ते ५० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, सुमारे २० हजार एकर जमीन संपादित करावी लागेल.
जिल्ह्यात या गावांतून जाणार हरित महामार्ग
◼️ खानापूर तालुका : माहुली, वलखड, वैजेगाव, भेंडवडे, साळशिंगे, जोंधळखिंडी, माधळमुठी, वासुंबे, रेणावी, रेवणगाव, घोटी बुद्रुक आणि घोटी खुर्द, शिरगाव, हातनोली, बस्तवडे, सावळज, वज्रचौंडे, मणेराजुरी आणि गव्हाण.
◼️ तासगाव तालुका : कचरेवाडी, नरसेवाडी, किंदरवाडी, विजयनगर, पेड, मोराळे, मांजर्डे.
◼️ कवठेमहांकाळ तालुका : बोरगाव, मळणगाव, हरोली, देशिंग, बनेवाडी, शिंदेवाडी, कुकटोळी, रामपूरवाडी आणि कोगनोळी.
◼️ मिरज तालुका : सलगरे, बेळंकी आणि संतोषवाडीमधून प्रवास करेल.
अधिक वाचा: यंदा दुष्काळाची शक्यता; वाचा मान्सूनबाबत हवामान विभागाने दिलेला पहिला दीर्घकालीन अंदाज
