कोल्हापूर : मागील हंगामातील उसाचा दर 'आरएसएफ'नुसार देण्याबरोबरच इतर मागण्यांबाबत लवकरच साखर आयुक्तांसोबत बैठक आयोजित करण्याच्या आश्वासनानंतर गेले पाच दिवस प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेतले.
मागण्यांबाबत काहीच दखल घेतली जात नसल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाले, गेट ढकलून आत घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर साखर उपसंचालक गोपाळ मावळे यांच्यासमवेत बैठक झाली.
सहसंचालक कार्यालयाला जे अधिकार आहेत, त्यानुसार संबंधित कारखान्यांना सूचना देण्यात येतील. साखर आयुक्तांच्या पातळीवरील प्रश्नांबाबत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन साखर उपसंचालक गोपाळ मावळे यांनी दिले.
त्यानंतर, आंदोलन मागे घेण्याची घोषणा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. प्रा. जालंदर पाटील, शिवाजी माने, जनार्दन पाटील, भगवान काटे, रुपेश पाटील, वैभव कांबळे, संदीप देसाई आदी उपस्थित होते.
वजनकाट्याच्या भरारी पथकात आता इंजिनिअर
साखर कारखान्यांच्या वजन काटा तपासणी भरारी पथकात अधिकारी, तहसीलदार असतात, पण त्यांना त्यातील तांत्रिक बाबीची पुरेशी माहिती नसते. यासाठी आता या पथकात आय. टी. इंजिनिअरची नियुक्ती करण्याबाबत विचार सुरू असल्याचे उपसंचालक मावळे यांनी सांगितले.
..तर लेखापरीक्षकांवरही होणार कारवाई
२७ व्या घटनादुरुस्तीनंतर लेखापरीक्षक नेमणुकीचे अधिकार संस्थांना असल्याने साखर कारखानदार त्यांची नेमणूक करतात. तरीही, कोणी चुकीचे काम करत असेल तर पॅनेलमधून वगळण्याबाबत साखर आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवू, अशी ग्वाही मावळे यांनी दिली.
आडसाली लावण असूनही रिकव्हरी कमी कशी?
◼️ जिल्ह्याच्या पूर्वेकडील साखर कारखान्यांना एकूण गाळपाच्या ६० टक्के ऊस आडसाल लावणीचा असतो. वास्तविक येथे रिकव्हरी चांगली असायला हवी.
◼️ या उलट, पश्चिमेकडील डोंगराळ तालुक्यातील कारखाने २० टक्के आडसाली उसाचे गाळप करतात तरीही त्यांची रिकव्हरी सर्वाधिक कशी? या मखलाशीला चाप लावा, अशी मागणी प्रा. जालंदर पाटील व शिवाजी माने यांनी केली.
थकीत एफआरपीबाबत सुनावणी पूर्ण
◼️ कोल्हापूर विभागातील १३ कारखान्यांकडे मागील हंगामातील ३५ कोटी एफआरपी थकीत आहे. याबाबत, साखर आयुक्तांच्या पातळीवर सोमवारी अंतिम सुनावणी झाली असून, लवकरच आरआरसीची कारवाई होईल.
◼️ त्याचबरोबर थकीत एफआरपीची माहिती देताना त्यामध्ये व्याजाच्या कॉलमचा समावेश करण्याच्या सूचना कारखान्यांना दिल्याचे उपसंचालक मावळे यांनी सांगितले.
अधिक वाचा: अवघ्या ४५ मिनिटांत उसाचा एक ट्रेलर भरणार; शेतकरीपुत्राने तयार केले 'हे' ऊस भरणी यंत्र
