Join us

पिकांच्या पाणी व्यवस्थापनाचे महत्व जाणत ठिबक सिंचनातून कडेगाव तालुका होतोय समृद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 13:26 IST

Farming Water Management : एकेकाळी कोरडवाहू व डोंगराळ भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्याने आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीचे रूपडे पालटले आहे.

एकेकाळी कोरडवाहू व डोंगराळ भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्याने आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीचे रूपडे पालटले आहे.

टेंभू व ताकारी या जलसिंचन योजनांनी ज्या भूमीवर कधीकाळी पीक उगवत नव्हते, तीच भूमी आता फळांनी, फुलांनी आणि हरित समृद्धीने बहरलेली आहे.

१६ हजार हेक्टरवर यशस्वीपणे कार्यरत ठिबक सिंचन प्रणालीमुळे हे शक्य झाले आहे. हे परिवर्तन ताकारी व टेंभू सिंचन योजनांमुळे झाले असून, कडेगाव तालुका आज राज्यातील इतर भागांसाठी एक आदर्श ठरत आहे.

एकेकाळी दुष्काळाने होरपळलेल्या मातीने आता सुवर्णमूल्य धान्ये, फळे आणि हरित समृद्धीचा इतिहास लिहायला सुरुवात केली आहे.

'आयएसआय' नसले तरी परिणाम 'हाय क्लास'

अनुदान वेळेवर न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आयएसआय नसलेले ठिबक संच स्वीकारले. पण, त्यांचाही उपयोग अत्यंत परिणामकारक ठरला. आज हेच संच शेतकरी वर्गाला लाखोंचे उत्पन्न देत आहेत.

शाश्वत शेतीकडे वाटचाल

ठिबक सिंचनाद्वारे पाणीच नव्हे, तर खत, कीटकनाशकांचा अचूक वापर केल्याने जमिनीचे आरोग्य सुधारले. शेतीत शाश्वततेचा अध्याय लिहिला जात आहे.

शेतीत आधुनिकतेची कास

• आज कडेगावचा शेतकरी केवळ निसर्गावर अवलंबून नाही, तर तो विज्ञान, तंत्रज्ञान व आधुनिक पद्धतींचा योग्य वापर करून भरघोस उत्पादन घेत आहे.

• ऊस, द्राक्ष, केळी, आंबा, हळद, आले आणि भाजीपाला या सर्व पिकांत आश्चर्यकारक उत्पादनवाढ झाली आहे.

• एकरी उसाचे उत्पादन काही ठिकाणी १०० टनपर्यंत पोहोचले आहे. आता केवळ उत्पादन नव्हे तर गुणवत्तेच्या आधारे उच्च बाजारभाव मिळत आहे.

हेही वाचा : गोटखिंडी येथील थोरात बंधूंनी घेतला आधुनिक शेतीचा ध्यास; केळीतून वर्षाला घेताहेत ६० लाखांचं उत्पन्न

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीफळेफलोत्पादनभाज्यापीक व्यवस्थापनपाणीसांगली