पुणे : मराठवाड्यात झालेला अपुरा पाऊस वगळता राज्यातील बहुतांश विभागांमध्ये सरासरी इतका पाऊस झाल्याने आतापर्यंत सुमारे १ कोटी १० लाख हेक्टरवरील (७६ टक्के) खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
यात सोयाबीनचीपेरणी ८८ टक्के पूर्ण झाली असून कापसाची लागवड देखील ८१ टक्क्यांपर्यंत झाली आहे. कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत २९८ मिलिमीटर अर्थात १०१ टक्के पाऊस झाला आहे.
मध्य महाराष्ट्रातील ३, विदर्भातील १ तर मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांमधील एकूण २० तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण २५ ते ५० टक्केच असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. मात्र, १७० तालुक्यांमध्ये सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे.
निर्धारित मुदतीच्या जवळपास तीन आठवडे लवकर दाखल झालेल्या मान्सूनने जूनमध्ये मात्र उघडीप दिली. जूनच्या अखेरीस राज्यात दाखल झालेल्या मान्सूनने बहुतांश जिल्ह्यात सरासरी गाठली असली तरी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
जालना, बीड, लातूर, धाराशिव व परभणी या ५ जिल्ह्यांमधील १५ तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण २५ ते ५० टक्के इतकेच आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये पेरणीवर विपरीत परिणाम झाला.
काही ठिकाणी दुबार पेरणीचेही संकट उभे असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. नंदुरबारमधील १, अहिल्यानगरमधील ३ आणि वर्धा जिल्ह्यातील एका तालुक्यातही पाऊस कमीच आहे.
दुसरीकडे ५० ते ७५ टक्के पाऊस पडलेल्या तालुक्यांची संख्या ६६ इतकी आहे. त्यात जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
तर ७५ टक्के ते १०० टक्के पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, नांदेड, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. तसेच शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस १७० तालुक्यांमध्ये झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
यात नाशिक, पुणे, कोल्हापूर, संभाजीनगर मधील ५ तालुके, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.
संभाजीनगर आघाडीवर
राज्यात आतापर्यंत १ कोटी १० लाख हेक्टरवर खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सरासरी क्षेत्राच्या हे प्रमाण ७६ टक्के इतके आहे. पेरण्यांचे सर्वाधिक प्रमाण संभाजीनगर विभागात ८८ व लातूर विभागात ८६ टक्के इतके आहे. पुणे विभागात ८४, अमरावती विभागात ८३ तर नाशिक विभागात ७६ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. नागपूर विभागात ५२ कोल्हापूर विभागात ५५ तर सर्वात कमी २४ टक्के पेरण्या कोकण विभागात झाल्या आहेत.
सोयाबीनला पसंती
खरिपात सोयाबीन पिकाचे सरासरी क्षेत्र जवळपास ४७ लाख २१ हजार हेक्टर इतके आहे. या पिकाची आतापर्यंत ४१ लाख ७२ हजार २११ हेक्टरवर अर्थात ८८ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. कापसाची सरासरी पेरणी ४२ लाख ४७ हजार २१२ हेक्टरवर होत असून आतापर्यंत ३४ लाख ३१ हजार ३२९ हेक्टर अर्थात ८१ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
अधिक वाचा: शेतजमीन तुकडेबंदी कायदा रद्द होण्याची शक्यता; काय होईल निर्णय? वाचा सविस्तर