तेलबियांमध्ये समावेश असलेल्या तसेच आयुर्वेदामध्येही ज्या पिकाला महत्त्व आहे, अशा जवसाच्या पिकाकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे.
जवसाला बाजारात चांगला दरही मिळतो, असे असूनदेखील जिल्ह्यातून हे पीक हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १९ हेक्टरवर पेरा
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जवस पेरण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. रब्बी हंगामात शेतकरी घरात चटणीसाठी वापरता येतील; अथवा पुढील वर्षासाठी घरचे बियाणे मिळेल, या उद्देशाने एक किंवा दोन तिफण जवसाची पेरणी करतात. जिल्ह्यात यावर्षी केवळ १९ हेक्टरवर जवसाचा पेरा झाला आहे.
जवसाला बाजारात ८ हजार रुपये दर
मानवाच्या रोजच्या आहारात जवसाचा वापर वाढविण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यामुळे खऱ्या जवसाची औषधी दुकानातही विक्री होताना दिसते. किराणा दुकानावर जवस १०० रुपये किलो दराने विक्री केले जाते, तर होलसेल बाजारात ८ ते ९ हजार रुपये प्रति क्चेिटल, असा जवसाला दर मिळतो.
कोणत्या तालुक्यात किती पेरा?
तालुका | पेरा (हेक्टरमध्ये) |
छत्रपती संभाजीनगर | ०० |
पैठण | ३ हेक्टर |
गंगापूर | ०० |
वैजापूर | ०० |
कन्नड | ०० |
खुलताबाद | ०० |
सिल्लोड | १६ |
सोयगाव | ०० |
फुलंब्री | ०० |
सर्वाधिक लागवड सिल्लोड तालुक्यात
• जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक १६ हेक्टर क्षेत्रावर जवसाची पेरणी झाली.
• विशेष म्हणजे, मागील पाच वर्षांची जिल्ह्याची जवस पेयाची सरासरी १४ हेक्टर आहे.
जिल्ह्यातील जवस पिकाचे क्षेत्र अत्यल्प आहे. आजपर्यंतच्या पीक पेऱ्याची आकडेवारी पाहिल्यास जवसाची जिल्ह्याची १६ सरासरी केवळ १४ हेक्टर आहे. यावर्षी मात्र प्रथमच जवसाचा पेरा १९ हेक्टरपर्यंत वाढला आहे. शेतकरी केवळ एक, दोन तिफण जवसाचा पेरा करतात. - प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक.