पुणे : मृग बहरातील हवामान आधारित फळ पीकविमा योजनेत द्राक्ष बागायतदारांनी मोठा सहभाग नोंदविला असून, प्रत्यक्ष नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपेक्षा विमा काढलेल्या शेतकऱ्यांची संख्या तीनपट झाली आहे.
विदर्भातील महत्त्वाचे पीक असलेल्या संत्रा उत्पादकांनीही एकूण नोंदणीच्या तुलनेत ८० टक्के जणांनी विमा उतरविला आहे.
मराठवाड्यासाठी महत्त्वाचे पीक असलेल्या मोसंबी उत्पादकांनी मात्र, या योजनेकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले असून, नोंदणी केलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी २३ टक्के शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे.
एकूण आठ पिकांसाठी असलेल्या या योजनेत आतापर्यंत २३ हजार २०४ अर्थात ३१ टक्के शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे.
या पिकांसाठी मुदत संपली
- हवामान आधारित फळ पीकविमा योजनेत मृग बहरातील संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, लिंबू, सीताफळ व द्राक्ष या फळबागांचा विमा उतरवण्यात येत आहे.
- यात लिंबू, द्राक्ष, पेरू, संत्री, मोसंबी व चिकू या सहा पिकांसाठी विमा उतरवण्याची ३० जूनची मुदत संपली.
- डाळिंबासाठी १४ जुलै व सीताफळासाठी ३१ जुलै अशी मुदत आहे. ३० जूनपर्यंत ७३, ७७२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.
मोसंबी उत्पादकांची पाठ
- मराठवाड्यासाठी महत्त्वाचे असलेल्या मोसंबी पिकाच्या विम्याबाबत शेतकरी उदासीन असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.
- मोसंबी पिकासाठी २३ हजार ३८८ शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली होती.
- प्रत्यक्षात ५ हजार ४१९ अर्थात २३.४३ टक्के शेतकऱ्यांनीच या योजनेत विमा उतरविला आहे.
- लिंबू पिकासाठी ४ हजार ७८९ शेतकऱ्यांपैकी ३ हजार २८४ (६८.५७ टक्के)
- पेरू पिकासाठी १ हजार ६९ पैकी ६५३ (६१ टक्के)
- चिकू पिकासाठी ४ हजार १३२ पैकी ३ हजार २६७ (७९ टक्के)
- डाळिंब पिकाच्या २७ हजार ९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, आतापर्यंत ५८० शेतकऱ्यांनी विमा काढला आहे.
द्राक्ष पीक आघाडीवर
◼️ द्राक्ष पिकासाठी राज्यात ४२५ शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली होती. प्रत्यक्षात १ हजार २२१ शेतकऱ्यांनी फळपीक विमा उतरविला असून, एकूण नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या तुलनेत हे प्रमाण २८७ अर्थात सुमारे तीनपट इतके झाले आहे.
◼️ विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये संत्री पीक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकासाठी १० हजार ५१५ शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यातील ८ हजार ४५ अर्थात ८० टक्के शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे.
१६ हजार ८४४ हेक्टरवर विमा
- या २३ हजार २०४ शेतकऱ्यांनी एकूण १६ हजार ८४४ हेक्टरवरील पिकाचा विमा उतरविला आहे.
- यातून १७७ कोटी २ लाख रुपयांची रक्कम विमा संरक्षित झाली आहे.
- यात शेतकऱ्यांचा विमा हप्ता ८ कोटी ८५ लाख असून, राज्याचा विमा हप्ता १५ कोटी ७१ लाख इतका, तर केंद्र सरकार १४ कोटी २९ लाख रुपयांचा हप्ता देणार आहे. एकूण विमा हप्त्याची रक्कम ३८ कोटी ८७ लाख इतकी आहे.
अधिक वाचा: 'मागेल त्याला सौर कृषी पंप' या योजेनेचे काम कसे चालते? कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर