भारताला आगामी वर्ष २०२५-२६ वर्षामध्ये साखर निर्यात करावी लागणार आहे. कारण देशामध्ये साखरेचे उत्पादन वाढणार आहे; तसेच देशात पुढच्या वर्षी इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यात येणार आहे.
जगातील साखर व इथेनॉल उत्पादनाचा अभ्यास करता, भारताचा साखर व इथेनॉल उत्पादनात जगामध्ये दबदबा कायम आहे, असे प्रतिपादन भारताच्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि.१३) केले.
दुबई साखर परिषद २०२५ ही ७२ देशांतील ७०० प्रतिनिर्धीच्या उपस्थितीत सध्या सुरू आहे. या साखर परिषदेत बुधवारी 'आम्ही भारतासाठी पुढे काय पाहतो?' या विषयावरील चर्चासत्र झाले.
या चर्चासत्रातील भारताच्या भूमिकेबद्दल दुबईच्या साखर परिषदेत उत्सुकता दिसून आली. या चर्चासत्राच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांनी भारत सरकारची बाजू भक्कमपणे मांडली. ते पुढे म्हणाले, चालू वर्ष २४-२५ मध्ये भारताने १० लाख मे.टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे.
जागतिक साखर बाजारामध्ये भारताच्या साखरेची गुणवत्ता चांगली आहे. त्यामुळे भारताच्या साखरेला जगात मोठी मागणी आहे. भारताने आणखी साखरेची निर्यात करावी, असा सूर या साखर परिषदेतून व्यक्त करण्यात आला.
यासंदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, भारत देशामध्ये साखर ही अत्यावश्यक सेवेमध्ये येते. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, ग्राहक व कारखानदार या सर्वांचा समन्वय ठेवून भारत सरकारला धोरणे आखावी लागतात.
केंद्र सरकार व राज्य सरकारे ही देशातील साखर उद्योगांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे भारतात गेल्या ८ वर्षामध्ये इथेनॉलमध्ये झालेली वाढ ही जगात इतरत्र कोणत्याही देशामध्ये झालेले नाही.
या चर्चासत्रामध्ये अनुप कुमार (व्यवस्थापकीय संचालक, सक्छेन इंडिया), नीरज शिरगावकर (अध्यक्ष, इंडियन शुगर अॅड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन), रवी गुप्ता (संचालक श्री रेणुका शुगर), दीपक बल्लानी (महासंचालक, इंडियन शुगर अॅड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन), संदीप कदम (अध्यक्ष, एक्झिम समिती, ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन), अश्विनी श्रीवास्तव (सहसचिव, साखर, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग, भारत सरकार) यांनी सहभाग घेतला.
साखर उद्योगाला भक्कम सहकार्य
दुबई जागतिक साखर परिषदेमध्ये राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी भारत सरकारची साखर उद्योगासंदर्भातील बाजू भक्कमपणे मांडली. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे भारतातील साखर उद्योग हा जगामध्ये पुढे जात आहे; तसेच इथेनॉल उत्पादनात भारत देश जगामध्ये अग्रेसर राहिला आहे, असे या चर्चासत्रामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
अधिक वाचा: Maharashtra Sugar Commissioner : सिद्धाराम सालीमठ यांची राज्याच्या साखर आयुक्तपदी नियुक्ती