हिवाळा सुरू होताच पक्षाघाताच्या (स्ट्रोक) रुग्णांची संख्या लक्षणीय वाढल्याचे दिसत आहे. इंडियन स्ट्रोक असोसिएशनच्या माहितीनुसार, भारतात दरवर्षी सुमारे १५ लाख स्ट्रोक आलेले नवीन रुग्ण आढळतात.
मृत्यू आणि दीर्घकालीन अपंगत्वाची ही प्रमुख कारणे ठरत असून, बदलती जीवनशैली आणि दीर्घकालीन आजारांमुळे ही संख्या चिंताजनकरीत्या वाढत आहे.
विशेषतः कडाक्याच्या थंडीत स्ट्रोकचा धोका अधिक असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. थंड हवामानामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तदाब वाढतो आणि मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होण्याची शक्यता वाढते.
परिणामी पक्षाघाताचा धोका अधिक निर्माण होतो. हिवाळ्यात सर्दी, खोकला, दमा, सीओपीडीसारख्या श्वसनविकारांचे प्रमाण वाढते. या आजारांमुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते.
त्याचा परिणाम मेंदूवर होऊन पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता बळावते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार तसेच धूम्रपान करणाऱ्यांमध्ये हा धोका अधिक असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. काही रुग्णांना पक्षाघाताची लक्षणे आढळून येत आहेत.
बोलण्यात अडचण येणे, चेहऱ्याचा एक भाग वाकडा होणे, हात-पाय सुन्न होणे ही पक्षाघाताची प्राथमिक लक्षणे असून, अशावेळी तातडीने रुग्णालयात दाखल करणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
हेमोरेजिक स्ट्रोकमध्ये मेंदूची रक्तवाहिनी फुटते
◼️ विविध रुग्णालयांत स्ट्रोकचे रुग्ण वाढताना दिसत आहेत.
◼️ हिवाळ्यात रक्त घट्ट होण्याची प्रक्रिया वाढते, रक्ताच्या गाठी तयार होण्याचा धोका जास्त असतो.
◼️ हेमोरेजिक स्ट्रोकमध्ये मेंदूतील रक्तवाहिनी फुटते आणि यामागे बहुतेक वेळा अनियंत्रित उच्च रक्तदाब कारणीभूत ठरतो.
पक्षाघाताची (स्ट्रोकची) लक्षणे
◼️ अचानक आणि तीव्र स्वरूपाची असू शकतात.
◼️ चेहऱ्याचा एक भाग वाकडा होणे, हात किंवा पायात अचानक कमजोरी अथवा बधिरपणा येणे.
◼️ बोलण्यात अडचण येणे, डोळ्यांसमोर धूसर किंवा दुहेरी दिसणे.
◼️ तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे किंवा तोल जाणे ही प्रमुख लक्षणे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
पक्षाघाताची कारणे
◼️ हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी घटते. त्यामुळे रक्त अधिक घट्ट होते आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
◼️ धूम्रपान, मद्यसेवन, अनियंत्रित मधुमेह व उच्च रक्तदाब हे घटक हिवाळ्यात अधिक धोकादायक ठरतात.
◼️ फ्लू व इतर संसर्गामुळे शरीरात दाहक प्रतिक्रिया वाढून स्ट्रोकचा धोका वाढू शकतो, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
पक्षाघात टाळण्यासाठी उपाय
◼️ स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, घरात नियमित हलका व्यायाम करणे, रक्तदाब व साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे.
◼️ हिवाळ्यात वाढणाऱ्या स्ट्रोकच्या घटनांमध्ये जागरूकता, विशेष उपचारांची उपलब्धता हाच जीव वाचवण्याचा आणि अपंगत्व टाळण्याचा निर्णायक मार्ग आहे.
अधिक वाचा: देशपातळीवर सर्वोत्कृष्ट ठरलेला 'हा' साखर कारखाना राज्यातही ठरला सर्वोत्तम
