फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेगाचे वारे २५ किलोमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त होऊन आंबा पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासांत विमा कंपनीस टोल फ्री क्रमांक १४४४७ वर किंवा कृषी विभागाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२५-२६ मध्ये आंबा व काजू पिकाकरिता भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात फळपीक विमा योजनेत आंबा पिकासाठी एकूण ३०,८४२ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.
संभावित हवामान धोके महसूल मंडळनिहाय स्थापित केलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रावर पर्जन्यमान, तापमान, वेगाचे वारे, आर्द्रता इत्यादी माहिती स्वयंचलितरीत्या नोंदवली जाते. या माहितीच्या आधारे शासन निर्णयामध्ये निर्धारित केलेल्या कालावधीत हवामान धोके लागू झाल्यानंतर विमाधारक शेतकरी यांना नुकसानभरपाई लागू होते.
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचे वातावरण असून, वेगाचे वारे २५ किलोमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त होऊन आंबा पिकाचे नुकसान झाल्यास फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी ७२ तासांत तक्रार दाखल करणे आवश्यक आहे.
संबंधित विमा कंपनी, महसूल विभाग व कृषी विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर पंचनामे करून नुकसानाचे प्रमाण निश्चित करेल, नुकसानाची तक्रार दाखल न केल्यास फक्त संदर्भ हवामान केंद्रावरील वेगाच्या वाऱ्याची नोंद ही नुकसानभरपाईसाठी पात्र होणार नाही.
विमा परताव्यासाठी आवश्यक हवामान प्रमाणके (आंबा पीक)
• वेगाचे वारे दि. १६ एप्रिल ते १५ मे १ या कालावधीत २५ किलोमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त (नुकसान झाल्यास ७२ तासांत विमा कंपनीस/कृषी विभागाकडे तक्रार करणे आवश्यक).
• दि. १६ एप्रिल ते १५ मे या कालावधीत कोणत्याही दिवशी वाऱ्याचा वेग २५ किलोमीटर प्रति तास राहिल्यास नुकसानभरपाई रक्कम २०,०३६ रुपये प्रति हेक्टर देय राहील.
• दि. १६ एप्रिल ते १५ मे या कालावधीत कोणत्याही दिवशी वाऱ्याचा वेग २५ किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त राहिल्यास नुकसानभरपाई रक्कम ३४ हजार रुपये प्रति हेक्टर देय राहील.
हेही वाचा : गोड पेक्षाही अधिक धोकादायक आहेत 'ही' तुमच्या मधुमेहाची खरी कारणे
