उदय कळस
म्हसळा : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात डिसेंबर महिन्यात आंब्याची पहिली पेटी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत येत असते.
यावर्षी पहिली पेटी येण्यास दोन महिने लागणार आहेत. हवामान बदलाचा फटका आंबा पिकाला बसला आहे. त्यामुळे आंबाबाजारात फेब्रुवारीमध्ये न येता तो मार्च, एप्रिल महिन्यांत येईल.
झाडाला मोहोर उशिरा आला
१) फळांचा राजा आंबा हा यंदा कोकणात उशिरा येणार असल्याचे आंबा बागायतदार सांगत आहेत. यावर्षी वातावरणात सातत्याने बदल झाला.
२) खराब हवामानाचा फटका आंबा पिकाला बसला आहे. त्यामुळे झाडाला मोहोर कमी प्रमाणात आणि उशिरा आला आहे.
३) पाभरे (ता. म्हसळा) येथील आंबा बागायतदार फैसल गिते यांच्या बागेतील पहिली आंब्याची पेटी डिसेंबरमध्ये वाशी येथील एफएमसी मार्केटमध्ये पाठवली जाते. आजपर्यंतचा हा रेकॉर्ड आहे. परंतु, या वर्षी ते शक्य नसल्याचे गिते यांनी सांगितले.
यंदा उत्पादनाला मोठा फटका
झाडाला खूप तुरळक मोहोर आला आहे. यामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहेत. बागा राखणे आणि त्यासाठी होणारी मेहनत आणि मशागत, मजुरी, खतपाणी यासाठी झालेला खर्च तरी वसूल होईल की नाही, याची चिंता त्यांना आहे. यंदा आंबा हंगाम फेब्रुवारीऐवजी एप्रिल महिन्यात सुरू होईल, असे फैसल गिते यांनी सांगितले.
डिसेंबर महिन्यात आंब्याला कैरी लागलेली दिसते. मात्र, आता कुठे मोहोर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदा आंबा बाजारात फेब्रुवारीमध्ये न येता तो मार्च, एप्रिल महिन्यांत येईल. वातावरणाच्या बदलामुळे ५ ते १० टक्केच मोहोर आलेला दिसत आहे. - फैसल गिते, आंबा बागायतदार, म्हसळा
अधिक वाचा: जुन्या आंबा बागेचे उत्पादन वाढविण्यासाठी कोंकण कृषि विद्यापीठाचा महत्वाचा सल्ला