कोकणातील आंब्याला 'हापूस' हे पहिले आणि एकमेव भौगोलिक मानांकन मिळाले आहे. मात्र, वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी करत गुजरातने 'हापूस' वर दावा केला आहे. या मागणीला कोकणातील बागायतदारांनी कडाडून विरोध केला आहे.
याआधी शिवनेरी हापूस आंबा नावाने २०२२ सालात भौगोलिक मानांकनासाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने अर्ज केला आहे. त्यानंतर २०२३ सालात गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकनासाठी अर्ज केला आहे.
त्याबाबतची पूर्तता केल्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी पहिली सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान रत्नागिरीतील कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटनेचे डॉ. विवेक भिडे यांनी कोकणातील बागायतदारांची बाजू मांडून या मागणीला कडाडून विरोध केला.
याबाबत त्यांनी सांगितले की, २०१८ मध्ये कोकणातील आंब्याला 'हापूस' हे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मानांकन मिळाले आहे. त्यामुळे कोकणातील हापूस उत्पादकांना सुरक्षित बाजारपेठ मिळाली आहे.
मानांकनामुळे कोकण हापूसमध्ये होणारी भेसळही काही प्रमाणात थांबली आहे. मालावी देशात हापूसची लागवड करण्यात आली आहे. सन २०१५ पासून तिथून मालावी हापूस नावाने आंबा येत होता. मात्र, मानांकन मिळाल्यानंतर तो मालावी मँगोज या नावाने येतो, असे डॉ. भिडे यांनी सांगितले.
कोकणातील 'हापूस' या नावाला मानांकन मिळालं आहे. आमचा विरोध कुणाला नाही, पण 'हापूस' कोकणासाठी संरक्षित राहावा ही आमची मागणी आहे. वलसाड हापूसला मानांकन दिलं गेलं तर या संदर्भात आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ. - डॉ. विवेक भिडे, अध्यक्ष, कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटना.
