दत्ता पाटील
तासगाव : सततच्या हवामान बदलामुळे यंदा ७० टक्क्यांपेक्षा जास्त द्राक्षबागांमध्ये फळधारणा झाली नाही. फळधारणा झालेल्या द्राक्षबागांना घड कुजण्याचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना तब्बल ३५ हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या पाच लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार देणाऱ्या द्राक्ष उद्योगाला सततच्या नुकसानीने कर्जाच्या खाईत लोटले आहे.
यावर्षी द्राक्षबागांचे झालेले नुकसान हे आजपर्यंतचे सर्वात मोठे नुकसान ठरले आहे. हतबल द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला नाही, तर द्राक्ष इंडस्ट्री सोबतच द्राक्ष उत्पादक देखील पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहेत.
मागील पाच वर्षांपासून हवामानातील बदलामुळे द्राक्ष उत्पादक हतबल झाला आहे. दरवर्षी फळछाटणीच्या हंगामात पाऊस आल्यामुळे आलेली द्राक्ष पदरात पडत नसल्याचे चित्र आहे.
यावर्षी हंगाम चांगला राहील, या आशेने द्राक्ष बागायतदारांनी पुन्हा नव्या जिद्दीने खरड छाटणी केली. मात्र, मे महिन्यातच पावसाळा सुरू झाला आणि आजअखेर संपला नाही.
हवामानातील बदलामुळे पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नसल्याने घडनिर्मिती झाली नाही. त्यामुळे बहुतांश द्राक्षबागा वाया गेल्या आहेत. जिल्ह्यात अंदाजे ७० हजार एकर द्राक्षबागेचे क्षेत्र आहे
एक एकरातून सरासरी पाच लाख रुपयांचे उत्पन्न द्राक्ष बागायतदारांना अपेक्षित असते. या पाच लाख रुपयांसाठी तीन लाख रुपयांचा खर्च करावा लागतो. मात्र केलेला खर्च पाण्यात गेला आहे.
परिणामी, द्राक्षबागांतून मिळणारे ३५ हजार कोटी रुपयांचे नुकसान द्राक्ष उत्पादकांना सहन करावे लागणार आहे. याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी गांभीऱ्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा द्राक्ष बागायतदार उध्वस्त होणार आहे.
शासनाने तत्काळ मदत करावी
◼️ सात वर्षांपूर्वी दीड एकर द्राक्षबागेची लागण केली होती. मात्र दीड वर्षात खर्चदेखील मिळाला नाही. मागील चार वर्षांत द्राक्षबागेत तोटा सहन करावा लागला. यावर्षीही फळछाटणी केल्यानंतर बागेत झाडावर एखादा-दुसराच घड दिसतो आहे.
◼️ खर्च करून घातलेला खर्चही निघत नसल्यामुळे द्राक्षबाग काढून टाकली आहे. द्राक्षबाग लागणीसाठी आणि फळछाटणीसाठी घेतलेले १३ लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे.
◼️ शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहीजे शासनाने कर्जमाफीबाबत तत्काळ पाऊल उचलले नाही, तर द्राक्ष उत्पादकांची विदारक अवस्था होणार आहे. याकडे शासनाने गांभीऱ्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रीया, द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रवीण पाटील यांनी दिली.
जिल्ह्यासह द्राक्ष बागायतदार यंदा उद्ध्वस्त झाले आहेत. द्राक्ष शेतीत ४ वर्षांपासून ही परिस्थिती आहे. शासनाची मदत तुटपुंजी आहे. मार्चपूर्वी द्राक्ष बागायतदारांची सरसकट कर्जमाफी करावी. - मारुती चव्हाण, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ
अधिक वाचा: अजून फळधारणाच नाही; लाखो रुपयांचा खर्च गेला पाण्यात, ७० टक्के द्राक्षबागा झाल्या फेल
