सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याने यंदाचा गळीत हंगाम संपला असल्याची घोषणा केल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेले चार दिवस गोकुळ शुगरच्या गव्हाणीत बसून यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊस दर जाहीर करण्याची, तसेच मागील हंगामातील शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम तातडीने देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते.
चार दिवसांच्या आंदोलनामुळे कारखान्याचे गाळप थांबले होते. अखेर आज कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी यंदाचा गळीत हंगाम संपल्याची घोषणा करून शेतकरी संघटनेला ऊस दराबाबतचे लेखी पत्र दिले.
कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिटन २८०० रुपये एकरकमी दर देणार असल्याची घोषणा चेअरमन दत्ता शिंदे यांनी केली.
यंदाच्या हंगामात १५ डिसेंबरपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम २० फेब्रुवारीपर्यंत देणार आहेत.
तसेच त्यानंतर १६ जानेवारीपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या ऊस बिलाची रक्कम २८०० रुपयांप्रमाणे १० मार्चपर्यंत देणार असल्याचे लेखी पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आले आहे.
मागील हंगामातील थकीत बिलासाठी संघटना आग्रही..
◼️ मागील (सन २०२४-२५) गळीत हंगामातील थकीत ऊस बिलांच्या रकमा शेतकऱ्यांना तातडीने देण्याची मागणी संघटनेने लावून धरली होती. कारखान्याच्या आर्थिक अडचणी असून लवकरच त्यातून मार्ग निघेल.
◼️ येत्या २ फेब्रुवारीपर्यंत मागील हंगामातील थकीत बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याचे लेखी पत्र गोकुळ शुगरच्या वतीने देण्यात आले आहे.
अधिक वाचा: सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना आता १० टक्के रक्कम भरून मिळणार सौर कृषीपंप; वाचा सविस्तर
