बापू सोळंके
कधी नव्हे ते यंदा मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बहुतेक सर्वच धरणे तुडुंब भरली आहेत. मराठवाड्यातील मोठ्या, मध्यम आणि लघू सिंचन प्रकल्पांद्वारे यंदा सर्वाधिक ५ लाख ४८ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कमी पावसाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील जनतेला सतत दुष्काळाचा सामना करावा लागतो. दरवर्षी शेकडो गावांची तहान टँकरद्वारे बाहेरून पाणी आणून भागवावी लागते. यामुळे मराठवाड्याला 'टँकरवाडा' म्हणूनही दूषणे दिली जातात. यंदा वरुणराजाने मराठवाड्यात कहर केला. अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे नुकसान झाले. मात्र, मोठे, मध्यम आणि लघू सिंचन प्रकल्प पाण्याने भरले आहेत.
या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी सिंचनाकरिता पाणी पाण्यासाठी यंदा भटकावे लागणार नाही. उपलब्ध होणार आहे. शिवाय पिण्याच्या पैठण येथील जायकवाडीसह ११ मोठी धरणे, ७५ मध्यम प्रकल्प आणि ७५४ लघु सिंचन प्रकल्प विभागात आहेत. शिवाय गोदावरी नदीवर १५ तर तेरणा, मांजरा आणि रेणा नदीवर ३५, असे एकूण ५० उच्चपातळी कोल्हापुरी बंधारे आहेत. हे सर्व प्रकल्प यंदा पाण्याने तुडुंब भरले आहेत.
या सर्व प्रकल्पांची सिंचनक्षमता १२ लाख ४५ हजार हेक्टर आहे. असे असूनही आजपर्यंत एवढे क्षेत्र कधीच सिंचनाखाली येऊ शकले नाही. पावसाचे कमी प्रमाण हे याचे मुख्य कारण आहे. दुसरे म्हणजे कालव्यांची नियमित डागडुजी न होणे. परिणामी, धरणांतून कालव्यांद्वारे सोडलेले पाणी प्रस्तावित शेवटच्या शेतापर्यंत पोहोचत नाही.
त्यामुळे प्रस्तावित सिंचन क्षमता पाटबंधारे विभागाला कधीच गाठता आली नाही. पाटबंधारे विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, गतवर्षी २०२३-२४ मध्ये मराठवाड्यात ४ लाख ५७हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले होते. यंदा जोरदार पाऊस झाला.
सर्व प्रकल्प आज भरलेले असल्याने या प्रकल्पांतून शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे २० टक्के सिंचनक्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. यानुसार सुमारे साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र यंदा सिंचनाखाली येण्याचा अंदाज आहे.
नियोजन सल्लागार समितीच्या बैठकीत
• प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेचा विचार करून पाटबंधारे विभागाने सिंचनाचे नियोजन सुरू केले आहे. या नियोजनासाठी पालकमंत्र्यांना १५ नोव्हेंबरनंतर कालवा सल्लागार समितीची बैठक घेणे बंधनकारक आहे.
• या बैठकीत उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून पिण्यासाठी, औद्योगिक वापरासाठी राखीव पाणी आणि सिंचनासाठी उपलब्ध पाणी यावर चर्चा करण्यात येईल. यानंतर पाणी वापराचे नियोजन ते करतील.
जायकवाडीतून १ लाख ३० हजार हेक्टर सिंचनाखाली
• जायकवाडी प्रकल्पाची सिंचन क्षमता १ लाख ८७ हजार हेक्टर आहे. मात्र, प्रकल्पाची कालवे आणि अन्य वितरण प्रणाली नादुरस्त असल्याने कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नाही.
• यंदा डाव्या आणि उजव्या प्रकल्पाद्वारे छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड या जिल्ह्यातील १ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याचा अंदाज आहे.
• पूर्णा आणि निम्न मानार प्रकल्पातून १ लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. तर, बंधाऱ्यातून सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याचा अंदाज आहे.