दत्ता पाटील
तासगाव : जिल्ह्यात रब्बी हंगामाची कामे जोमाने सुरू आहेत. जिल्ह्यातील तासगावसह विविध भागात ऐन रब्बी हंगामात गरज असताना खत दुकानदारांनी युरिया खताचे कृत्रिम टंचाई केली आहे.
खत शिल्लक नसल्याचे सांगून जादा दराने विक्री होत आहे. तर काही कृषी दुकानातून अन्य खते लिंकिंग करून विकली जात आहेत. शेतकऱ्यांच्या राजरोसपणे लूट होत असताना कृषी विभागाने मात्र गांधारीची भूमिका घेतली आहे.
एकट्या तासगाव तालुक्यात ९२ परवानाधारक खत विक्रेते आहेत. यातील काही परवानाधारक विक्रेत्यांकडे युरियाचा तुटवडा आहे. तर काही विक्रेत्यांकडे युरियाचा साठा शिल्लक आहे.
प्रशासनाच्या आकडेवारीनुसार तालुक्यातील खत दुकानात ८३५ युरिया शिल्लक आहे. गरज असताना देखील अनेक दुकानातून युरियाची कृत्रिम टंचाई करण्यात आली आहे. हीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर तालुक्यातही आहे.
यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे, मुबलक पाणी असल्यामुळे रब्बी हंगामाचा चांगला पेरा झाला आहे. रब्बी हंगामात युरियाची शेतकऱ्यांकडून मोठी मागणी होत असते.
मात्र, खत विक्रेत्यांकडून खत उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. मोजक्या खत दुकानात युरिया उपलब्ध आहे. मात्र, या दुकानदारांकडून प्रती पोत्यामागे ३० ते ५० रुपये ज्यादा दराने विक्री केली जात आहे.
खत विक्रेत्यांकडून युरिया हवा असेल, तर नॅनो युरिया, नॅनो डीएपी, ऍझोला, बायोला आणि १९:१९:१९ या खतांचे लिंकिंग करून सक्ती केली जाते.
युरियासाठी काही शेतकऱ्यांना लिंकिंगद्वारे खत घेऊन भुर्दंड सहन करावा लागत आहे. गरजेवेळी एरिया मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
कृषी विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष...
• दुसरीकडे तालुक्यात राजरोसपणे जादा दराने खत विक्री आणि लिकिंगची विक्री सुरू असताना देखील तालुक्यातील कृषी विभागाने मात्र गांधारीची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
• या प्रकाराचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना वाली कोण?
यंदा पाऊस चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी ज्वारी, गहू, मका या पिकांची पेरणी केली आहे. त्यामुळे यंदा तासगाव तालुक्यासह जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त रब्बीचा पेरा झाला आहे. ऐन हंगामात गरजेच्या वेळी तालुक्यात युरियासह डीएपीची देखील टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, या टंचाई आणि लुटीबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाली कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अधिक वाचा: संख गावात ३० एकर शेवग्याच्या शेतीतून समृद्धी आणणाऱ्या डॉक्टरची यशोगाथा; वाचा सविस्तर