Join us

शेतकऱ्यांनो, सोयाबीनचे एकरी उत्पादन वाढवायचे ना? मग करा या अष्टसूत्रीचा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 09:40 IST

कृषी विभागाचा सल्ला : हेक्टरी उत्पादकता वाढविण्याचे उद्दिष्ट

वाशिम जिल्ह्यातील एकूण लागवड  क्षेत्रापैकी जवळपास ७५ टक्के क्षेत्रावर दरवर्षी सोयाबीन पीक घेतले जात असून, सोयाबीनचे हेक्टरी उत्पादन वाढविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने अष्टसुत्रीचा वापर करावा, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

जिल्ह्याचे संपूर्ण अर्थकारण सोयाबीन पिकावर अवलंबून आहे. सन २०२४-२५ या वर्षात जिल्ह्यात तीन लाख तीन हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सोयाबीनची सरासरी हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना अष्टसुत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. हलक्या जमिनीत सोयाबीन पीक अपेक्षित उत्पादन देऊ शकत नाही.

त्याकरिता मध्यम ते भारी जमिनीवर या पिकाची लागवड करावी, दरवर्षी बाजारातील बियाणे खरेदी न करता तीन वर्षातून एकदा प्रमाणित बियाणे खरेदी करावे. घरगुती पध्दतीने साठवून ठेवलेल्या बियाण्याची उगवण क्षमता स्थानिक पातळीवर तपासून घ्यावी, रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया करावी, शक्यतो १० वर्षांच्या आतील प्रसारीत व आपल्या भागात शिफारस केलेल्या वाणाची निवड करावी, सोयाबीनचे अधिक उत्पादन येण्यासाठी सरी वरंभा, टोकण लागवड, बेडवर लागवड किंवा बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करावी. पेरणीची वेळ ७ जून ते १५ जुलै अशी आहे.

पेरणी करण्यास उशिर झाल्यास कमी कालावधीचे वाण वापरावे तसेच ७५ ते १०० मि.मी. पाऊस किंवा जमीन ६ इंच खोल ओलीची खात्री करून वापसा आल्यानंतर पेरणी करावी, दोन ओळीत संतुलित अंतर ठेवावे, वेळीच तण व कीड नियंत्रण करून रासायनिक खताची मात्राही संतुलित ठेवण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला.

अष्टसूत्रीत काय नमूद?

बियाणे व प्रतवारी, उगवणक्षमता तपासणी, बिजप्रक्रिया व योग्य वाणाची निवड, पेरणीचे अंतर व पेरणीच्या पध्दती, तण नियंत्रण, रासायनिक खत मात्रा, आंतरमशागत, एकात्मिक किड/ रोग व्यवस्थापन अशा अष्टसूत्रीचा वापर केल्यास सोयाबीनची हेक्टरी उत्पादकता वाढेल, असा आशावाद कृषी विभाग बाळगून आहे.

शेतकऱ्यांनी सोयाबीनचे अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी अष्टसूत्रीचा वापर करावा. पीक उत्पादकता वाढविण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे. - गणेश गिरी कृषी विकास अधिकारी, वाशिम.

अष्टसूत्रीबाबत आज खरोळ्यात मार्गदर्शन

• वाशिम तालुक्यातील खरोळा येथे १० जून रोजी सोयाबीन पिकाचे उत्पादन वाढविण्याकरिता सोयाबीन अष्टसूत्री विषयी मार्गदर्शन करण्यासाठी अष्टसूत्रीचे जनक तथा विभागीय कृषी सहसंचालक नागपूर शंकर तोटावार हे उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा, 'आत्मा'चे प्रकल्प संचालक अनिसा महाबळे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

• वाशिमचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असताना तोटावार यांनी उत्पादन खर्च कमी करून उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी सोयाबीनमध्ये होणाऱ्या छोट्याछोट्या चुका सुधारून त्या अष्टसूत्रीच्या माध्यमातून जिल्ह्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला व त्यामुळेच जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादनामध्ये वाढ झाली. सोयाबीन अष्टसूत्री वाशिम जिल्हापुरती मर्यादित न राहता आठ राज्यांमध्ये वेगवेगळ्या भाषेत प्रसारित करण्यात आली. या सोयाबीन अष्टसूत्रीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी खरोळा येथे १० जून रोजी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे यांनी केले.

हेही वाचा - Conch Snail Control शंखी गोगलगायीचे नियंत्रण करण्याची सोपी पध्दत

टॅग्स :सोयाबीनशेतकरीशेतीलागवड, मशागतपेरणीखरीपविदर्भअकोलावाशिममराठवाडापीक व्यवस्थापनशेती क्षेत्र