गेल्या महिनाभरापासून मक्याला बाजार समित्यांमध्ये मक्याला कवडीमोल असा १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे शासकीय हमीभावाने २४०० रुपये प्रतिक्विंटल दराने मका खरेदी करावा, यासाठी नाशिक जिल्ह्याच्या उमराणे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मका उत्पादक शेतकरी व प्रहार संघटनेच्या वतीने मंगळवार (दि. २५) रोजीपासुन ठिय्या आंदोलन सुरू आहे.
जोपर्यंत शासन हमी भावाने मका खरेदी केंद्रे सुरू करत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. मंगळवारी (दि. २५) रोजी सकाळी दहा वाजता बाजार समितीच्या मका लिलाव आवारात मका उत्पादक शेतकरी व प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत मक्याला २४०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव मिळावा, यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केले.
यावेळी बाजार समितीचे सभापती देवानंद वाघ यांनी आंदोलकांच्या मागण्या रास्त असून शासनाने लवकरात लवकर हमीभावाने मका खरेदी केंद्र सुरू करावेत, असे नमूद केले. बाजार समितीच्या वतीने पणन मंडळ व शासनस्तरावर आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला असून येत्या चार-पाच दिवसांत याबाबत सकारात्मक निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
त्यामुळे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सहायक सचिव तुषार गायकवाड यांनी केले. मात्र, आंदोलकांनी जोपर्यंत शासन हमीभावाने मका खरेदी करत नाही तोपर्यंत आमचे ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे बुधार (दि.२६) या दुसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच होते. दरम्यान, राज्य मार्केटिंग फेडरेशनकडून अद्यापही खरेदी सुरू न झाल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांत तीव्र नाराजी व्यक्त केली.
गळ्यात दोर अडकवून प्रशासनाचे वेधले लक्ष
आंदोलनादरम्यान प्रहार संघटनेचे हरिसिंग ठोके यांनी गळ्यात दोर अडकवीत शासनाने लक्ष वेधले. यावेळी धर्मा देवरे, बाळासाहेब देवरे यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात रतन देवरे, रत्नाकर देवरे, शिवाजी आहेर, माधव शिरसाठ, विकास देवरे, संदीप देवरे आदींसह मका उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हेही वाचा : हिवाळ्यात बाजरी खाण्याचे फायदे आणि आरोग्यदायक परिणाम वाचून तुम्हीही होणार थक्क
