अहिल्यानगर : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिके, फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने तातडीने पावले उचलत जिल्ह्यासाठी ८४६ कोटी ९६ रुपये अनुदान मंजूर केले आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे, अॅग्रिस्टॅक प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याची गरज नाही. मात्र, ज्यांच्याकडे अॅग्रिस्टॅक क्रमांक नाही, त्यांना सीएससी सेंटरमध्ये जाऊन ई-केवायसीची प्रक्रिया करावी लागणार आहे.
जिल्ह्यात १३ ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. शेतात पाणी साचल्यामुळे काढणीलाआलेली पिके बाधित झाली होती.
विशेष म्हणजे एका-एका महसूल मंडळात दोन ते तीनवेळा अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा अहवाल तयार करून राज्य शासनाला पाठविला आहे.
जिल्ह्यातील ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला होता. यासाठी राज्य शासनाने वेगाने पावले उचलत ८४६ कोटी ९६ लाख रुपये अनुदान मंजूर केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात ११ लाख १७ हजार २८२ शेतकरी आहेत. यातील ७लाख ९४ हजार ६४५ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले असून, अॅग्रिस्टॅक नोंदणीमध्ये अहिल्यानगर जिल्हा ७१.१२ टक्क्यांसह राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक ८७.२५ टक्के अॅग्रिस्टॅक नोंदणी केली आहे, तर सर्वात कमी टक्केवारी संगमनेर तालुक्याची ५१.५२ टक्के आहे.
शासन आदेशात काय म्हटले?
० ते २ हेक्टरपर्यंत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार. डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात मदत येणार. मदत वाटप झाल्यानंतर लाभार्थी व मदतीचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार. शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात वळती करू नये.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या अनुदान अपलोड करण्याची प्रक्रिया पोर्टलमध्ये सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आणि अॅग्रिस्टॅक आयडी नसेल तर सीएससी सेंटरमध्ये जाऊन ई-केवायसीची प्रक्रिया करून घ्यावी. - दादासाहेब गिते, निवासी उपजिल्हाधिकारी
अधिक वाचा: देशात उसाला सर्वाधिक दर देणारे राज्य कोणते? यंदाच्या हंगामात महाराष्ट्रात किती मिळेल दर?