मंगळवेढा उसाला किमान ३ हजार रुपये पहिली उचल द्या, या एकाच ठाम मागणीसाठी सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाने आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात उग्र आणि आक्रमक स्वरूप धारण केले आहे.
पंढरपूर तालुक्यातून पेटलेली आंदोलनाची ठिणगी मंगळवेढा, मोहोळ, माळा तालुक्यांसह जिल्हाभर वेगाने पसरत आहे. विशेष म्हणजे लोकमंगल कारखान्यात शेतकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत भजन आंदोलन केले.
खर्डी सीताराम, श्रीपूर पांडुरंगनंतर मंगळवेढा तालुक्यातील दामाजी साखर कारखान्यावर आंदोलन पेटले, तर रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी येणकी येथील जकाराया साखर कारखान्यात थेट धडक प्रवेश केला.
आंदोलकांनी गेटवर थांबण्याऐवजी थेट ऊस गव्हाणीवर कब्जा घेत भजन आंदोलन करत कारखान्याचे कामकाज ठप्प केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंढरपूर येथे आंदोलकांची भेट घेऊन आंदोलनाला बळ दिले. "कारखानदारांनी तातडीने ३ हजार रुपये पहिली उचल जाहीर करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल," असा थेट इशारा त्यांनी दिला.
कारखानदारांनी २८०० रुपये दर जाहीर करून मौन पाळण्याचा प्रयत्न केल्याने शेतकऱ्यांचा रोष आणखी वाढला आहे.
शेजारच्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत ३५०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळत असताना सोलापूर जिल्ह्यात एवढा मोठा फरक का, असा सवाल आता रस्त्यावर उतरला आहे.
आतापर्यंत कारखानदार जे दर देतील ते स्वीकारणारे शेतकरी आता संघटित होत वेट कारखाने बंद पाडण्याच्या भूमिकेत उतरले आहेत. आंदोलनाची धग दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे साखर कारखानदारांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
कारखान्याच्या प्रशासन सोबतची चर्चा फिसकटली
◼️ जकराया कारखान्यावर सकाळपासून आंदोलन सुरू होते. दुपारनंतर कारखाना प्रशासन आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. मात्र ही चर्चा फिसकटली.
◼️ कारखाना प्रशासनाने आठ दिवसांची मुदत द्या, अशी मागणी केली मात्र आंदोलकांनी त्यांची मागणी फेटाळून लावत दर जाहीर केल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे कारखाना रविवारी दिवसभर बंद होता
मौन न सोडल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता
◼️ शेतकन्यांच्या घामाचा योगा दर मिळावा, ही मागणी आता आर्थिक प्रश्नापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती हक्क व स्वाभिमानाची लढाई बनली आहे.
◼️ शेजारच्या जिल्ह्यांत ३५०० रुपयांहून अधिक दर असताना सोलापूर जिल्ह्यातील २८०० रुपये दराच्या अन्यायाबाबत कारखानदारांनी स्पष्ट भूमिका घ्यावी. वेळेत निर्णय घेतल्यास आंदोलन शांत होऊ शकते, अन्यथा वाढती तीव्रता रोखणे अवघड ठरेल.
शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही या अगोदरच ऊसदर जाहीर केला असून, तो आमच्या एफआरपीपेक्षा ३५० रुपये जास्त दिला आहे. यापेक्षा अधिक दर देणे हे कारखान्याला आर्थिकदृष्ट्या न परवडणारे आहे. तरीही मोहोळ तालुक्यातील अन्य साखर कारखाने जो दर देतील तो आम्हीही देऊ. - सचिन जाधव, कार्यकारी संचालक, जकराया शुगर्स
कारखानदार आमच्या घामाच्या पैशावर गप्प बसले आहेत. शेजारच्या जिल्ह्यांत ३५०० च्या वर दर मिळतो, मग सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांवर अन्याय का? ३ हजार रुपये पहिली उचल जाहीर झाल्याशिवाय एकही शेतकरी यापुढे गव्हाणीतून उठणार नाही. - युवराज घुले, जिल्हा संघटक, स्वाभिमानी शेतकरी संघटना
अधिक वाचा: Saur Krushi Pump : आता दहा टक्के रक्कम भरा आणि सौर कृषिपंप मिळवा; काय आहे योजना?
