विकास शहा
शिराळा : पावसाळा म्हटला की निसर्ग रंगीबेरंगी फुलांनी, झाडांनी आणि विविध कीटकांनी बहरतो. अशाच दिवसांत शिराळा तालुक्यातील गिरजवडे गावाजवळील दंडस्नान रस्त्यावर एक आकर्षक सुरवंट नुकताच आढळून आला.
हिरव्या, निळ्या, पिवळ्या आणि नारंगी छटांनी सजलेला हा सुरवंट स्थानिकांच्या उत्सुकतेचा विषय ठरला. परंतु कीटकशास्त्रज्ञांच्या मते हा सुंदर दिसणारा सुरवंट प्रत्यक्षात धोकादायक असून त्याला 'नेटल सुरवंट' किंवा 'स्लग मॉथ सुरवंट' म्हणून ओळखले जाते.
मागील वर्षी परतीच्या पावसावेळी काही पिकात ह्या अळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून आला आहे. शेतकऱ्यांनी या अळीच्या संपर्कापासून दूर राहावे.
काय आहे नेटल सुरवंट?
◼️ हा एक प्रकारचा पतंगाचा सुरवंट आहे.
◼️ याच्या अंगावर असलेले काटेरी केस फक्त सजावटीसारखे नसून त्यात सूक्ष्म प्रमाणात विषारी द्रव असते.
◼️ तो याचा वापर स्वसंरक्षणासाठी करतो.
◼️ काही ठिकाणी याला 'घोणस अळी' संबोधले जाते.
◼️ वैज्ञानिक भाषेत पॅरासा लेपिडा किंवा स्लग माँथ कॅटरपिलर म्हणून नोंद आहे.
◼️ भारतासह आशियातील काही उष्णकटिबंधीय प्रदेशांत व महाराष्ट्रातही अधूनमधून त्याचे दर्शन घडते.
का आहे धोकादायक?
◼️ अळीने सोडलेले रसायन त्वचेच्या संपर्कात आल्यास त्वचेवर चट्टे पडून अग्नी दाह होतो.
◼️ ही अळी माणसाच्या अंगावर किंवा माणसाच्या दिशेने येत नाही.
◼️ त्याचप्रमाणे या आळीच्या संपर्कात आपली त्वचा आल्यासच अग्नीदाह होत असतो, तो शक्यतो सौम्य असतो
◼️ ज्या व्यक्तींना अलर्जी आहे किंवा दम्याचा त्रास आहे त्या व्यक्तीमध्ये मात्र तीव्र स्वरूपाची लक्षणे आपणास पहावयाला मिळू शकतात.
◼️ या सुरवंटाच्या अंगावरील काट्यांचा स्पर्श झाल्यास तीव्र वेदना, जळजळ, खाज येते.
◼️ काही वेळा त्वचेवर लाल चट्टे किंवा फोड उठतात.
◼️ विशेषतः ऍलर्जी असणाऱ्यांसाठी त्याचा दंश अधिक त्रासदायक ठरू शकतो.
काळजी घ्यावी कशी?
◼️ सुरवंट दिसल्यास त्याच्यापासून अंतर ठेवा.
◼️ मुलांना त्याला स्पर्श करू न देण्याबाबत सावध करा.
◼️ अपघाती स्पर्श झाल्यास चिकट टेप त्वचेवर लावून काटे काढावेत व भाग साबणाच्या पाण्याने धुवावा.
◼️ बर्फ चोळल्याने जळजळ कमी होऊ शकते.
◼️ त्रास वाढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
अधिक वाचा: आता पीएम किसानचा हप्ता मिळणार फक्त शेतकऱ्याच्या पत्नीला; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर