सतत पडणाऱ्या पावसाने बऱ्याच ठिकाणी आता उघडीप दिली आहे. यात पावसामुळे झालेल्या चिखलात शेतकरीकांदा लागवड करत आहेत.
खरीप हंगामातील उडिद व मूग पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांची अपेक्षा सोयाबीनकडे आहे. मात्र, सोयाबीनच्या उत्पन्नावर अवलंबून न राहता मोठ्या आर्थिक उत्पन्नाच्या अपेक्षावर शेतकरीकांदा लागवडीकडे वळल्याचे दिसत आहे.
कांद्याला किमान यावर्षी तरी चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र, वाढती महागाई, खतांचे दर, मजुरीतील वाढ व मशागतीचा खर्च यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
पावसामुळे कांदा लागवडीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचे दिसते. खरीप व रब्बी पिकांबरोबरच अनेक शेतकरी कांदा पिकाकडे वळताना दिसून येत आहेत.
कृषी दुकानदारांकडे शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी मोठी गर्दी दिसते. ऑगस्टच्या शेवटी व सप्टेंबर महिन्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
त्यामुळे रोपांनादेखील शेतकऱ्यांकडून चांगली मागणी आहे. काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने बियाण्यांपासून रोपे तयार करून लागवड करतात, तर काही थेट पेरणी स्वरूपात कांदा लावतात.
राज्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड होत असली तरीही गेल्या काही वर्षांत कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढताना दिसतो आहे.
यावर्षीही चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवडीची तयारी सुरू केली आहे. कांद्याला अपेक्षित दर मिळाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल; पण महागडी बियाणे, खत व मजुरी यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे.
बियाण्यांच्या दरात मोठी वाढ, खिसा रिकामागतवर्षीच्या तुलनेत कांदा बियाण्यांच्या दरात तब्बल ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्यावर्षी १५०० ते १६०० रुपये प्रति किलो मिळणारे बियाणे यावर्षी २००० ते ३००० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले. या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा खिसा रिकामा होत आहे.