नितीन चौधरी
पुणे : शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अॅग्रिस्टॅक योजनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. कृषी सहायकांविना तलाठ्यांनीच या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे.
राज्यात आतापर्यंत ६ लाख ८८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, त्यातील ६ लाख शेतकऱ्यांना स्वतःची ओळख मिळाली आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या कृषीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक यापुढे बंधनकारक केला आहे. यासाठी अॅग्रिस्टॅक या योजनेत नावनोंदणी करणे शेतकऱ्यांना अनिवार्य आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती.
परंतु, कृषी सहायकांनी टाकलेल्या बहिष्कारानंतर या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, आता कृषी सहायकांविनाच ही योजना तलाठ्यांनी सक्षमपणे राबविण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात आतापर्यंत ६ लाख ८८ हजार १०४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, ६ लाख १ हजार २०८, शेतकऱ्यांना क्रमांक मिळाला आहे.
कोणत्या जिल्ह्यांचा योजनेत समावेश?
आघाडीचे पाच जिल्हे : नाशिक, जळगाव, बुलढाणा, अहिल्यानगर, सातारा.
तळातील पाच जिल्हे : बीड, भंडारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, चंद्रपूर.
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५.७८% तर शेतकरी ओळख क्रमांक दिलेल्यांची संख्या ५.०५% आहे.
अंमलबजावणीसाठी तलाठ्यांनी घेतला पुढाकार
१) शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी तलाठी प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांची माहिती गोळा करत आहेत, तसेच शेतकरीही स्वतःहून आपली ओळख व जमिनीची माहिती तलाठ्यांना देऊ शकतात किंवा अॅग्रिस्टॅक या संकेतस्थळावर नोंदवू शकतात.
२) राज्यात आतापर्यंत यासाठी मेळावे घेण्यात येत असून, शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. या जोडीला भूमी अभिलेख विभागाने सामायिक सुविधा केंद्रांनाही यात सामावून घेतले आहे.
अॅग्रिस्टॅक योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. तलाठ्यांनी त्यात पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांनी आपले ओळख क्रमांक तयार करून घ्यावेत. - सरिता नरके, राज्य समन्वयक, भूमी अभिलेख विभाग, पुणे
अधिक वाचा: मधुमक्षिकापालन हा कृषिपूरक व्यवसाय करून कमवा अधिकच उत्पन्न; योजनेसाठी आजच नोंदणी करा