दत्तात्रय शिंदे
वडाळा : तळहाताच्या फोडाप्रमाणे काळ्या आईची सेवा करून वडाळ्यातील शेतकऱ्याने एक एकरात टोमॅटोची लागवड केली. मशागत, बियाणे, खतांसह ५० हजार रुपये खर्च आला.
मात्र, बाजारात दर पडल्याने पाच कॅरेटमधील ८१ किलो टोमॅटोची पट्टी ४८५ आली त्यात १६१ रु. खर्च वजा जाऊन २९४ रुपये उरले. यातून मजुरांची हजेरी निघाली नाही.
अखेर निराश होऊन हनुमंत नागणे या शेतकऱ्यावर वडाळ्याच्या आठवडा बाजारात टोमॅटो फुकट वाटण्याची वेळ आली. रविवारी हा प्रकार निदर्शनास आला.
उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील वडाळा येथील रहिवासी असलेले शेतकरी हनुमंत अविनाश नागणे यांनी आपल्या एक एकर शेतामध्ये टोमॅटो पिकाची लागवड केली होती.
पीक उत्पादनासाठी मशागत, बियाणे, खत, लगवडीसाठीची मजुरी, औषधे असा एकंदरीत ५० हजार रुपये खर्च आला असल्याचे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
मात्र, उत्पादित केलेल्या टोमॅटोचे पाच कॅरेट त्यांनी सोलापूर येथील सिद्धेश्वर मार्केटमध्ये विकण्यासाठी नेले.
तेथे प्रतिकिलो पाच ते सात रुपये दराने विकला गेला. एकूण वजन ८१, किंमत ४८५ रुपये, वजा खर्च १६१ रुपये, एकूण शिल्लक रक्कम २९४ रुपये राहिली.
यामध्ये टोमॅटो तोडण्यासाठी जे मजूर लावले गेले त्या मजुराची हजेरीसुद्धा निघाली नाही, अशी व्यथा शेतकरी नागणे यांनी व्यक्त केली.
...त्यापेक्षा फुकट वाटलेले बरे!
◼️ अगोदरच पन्नास हजार रुपये खर्च करून एक एकरामध्ये टोमॅटोची लागवड केली.
◼️ चार पैसे हाती येतील अशी अपेक्षा होती. मात्र, उलटेच झाले.
◼️ झालेला खर्च निघण्याऐवजी पदरचे आणखी पैसे घालण्याची वेळ आली.
◼️ आधीच तोटा झाला मग हे मार्केटला जाण्यापेक्षा फुकट वाटण्याच्या निर्णय घेतला आणि वडाळा येथे रविवारच्या आठवडे बाजारात तो वाटावा लागल्याचे नागणे यांनी स्पष्ट केले.
अधिक वाचा: देशातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर ३३ लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज; केद्र सरकार कर्जमाफी करणार का?
