रत्नागिरी : आंबा-काजूचा हंगाम मे महिन्यात संपला. हंगाम संपला तरी अद्याप विमा कंपन्यांकडून फळपीक विमा परतावा जाहीर करण्यात आलेला नाही.
हंगाम संपल्यानंतर ४५ दिवसांत परतावा जाहीर करणे बंधनकारक आहे. मात्र, विमा कंपन्यांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे तब्बल ११५ दिवसांचा कालावधी लोटला तरी परतावा जाहीर करण्यात आलेला नाही.
यावर्षी नियमित हंगामापूर्वीच दि. २० मे रोजी पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा बागायतदारांच्या हातात येण्यापूर्वीच जमिनीवर आला. त्यामुळे बागायतदारांचे नुकसान झाले.
आधीच आंबा पीक कमी त्यातच थ्रीप्स, तुडतुडा, बुरशीजन्य रोग, फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्याने कीटकनाशक फवारणी करावी लागली. आंबा उत्पादन कमी असताना, दर गडगडल्याने बागायतदारांनी केलेला खर्चही वसूल झाला नसल्याचे आंबा बागायतदारांनी सांगितले.
तसेच अवकाळी पाऊस, गारपीठ, निच्चांक तापमान, सर्वोच्च तापमान यासारख्या समस्यांनी बागायतदारांचे नुकसान झाले आहे. बागायतदारांनी आर्थिक फटका बसला असला तरी अजून परतावा जाहीर झालेला नाही.
आता नवा हंगाम येईल
आता दोन महिन्यात आंब्याचा नवा हंगाम सुरू होईल. त्याचदरम्यान पुढील वर्षाची पीकविमा योजनाही कार्यान्वित होईल. मात्र आधीच्या हंगामाबाबत कोणतीच हालचाल झालेली नाही. त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
दरवर्षी डिसेंबरमध्येच बागायतदारांकडून फळपीक विमा योजनेची रक्कम वसूल केली जाते. शिवाय हंगाम संपल्यानंतर ४५ दिवसांत परतावा जाहीर करणे आवश्यक आहे. तरीही अद्याप विमा कंपन्यांकडून परतावा जाहीर केलेला नाही. गत हंगामात नैसर्गिक दृष्टचक्रामुळे बागायदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने विमा कंपन्यांकडून याची दखल घेत परतावा जाहीर करणे अपेक्षित आहे. - राजन कदम, बागायतदार
अधिक वाचा: अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईचा जीआर आला; कोणत्या जिल्ह्याला किती निधी?