संदीप माने
सांगली जिल्ह्याच्या खानापूर घाटमाथ्यावर यावर्षी सतत पडत असलेल्या पावसामुळे निर्यातक्षम द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत, यावर्षी द्राक्ष घडांची संख्या घटली असून औषधांच्या खर्चात मात्र बेसुमार वाढ झाली आहे. घाटमाथ्यावरील पळशी, हिवरे, बलवडी (खा), बेनापूर, सुलतानगादे, करंजे, बाणूरगड या परिसरामध्ये निर्यातक्षम द्राक्ष बागांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
सातत्याने अनेक संकटांचा सामना करणाऱ्या द्राक्ष बागायदारांना गेल्यावर्षी दर चांगला मिळाल्याने चांगले उत्पादन मिळाले होते. यावर्षीही द्राक्ष बागांपासून भरघोस उत्पन्नाची शेतकऱ्यांना आशा होती. मात्र यावर्षी उन्हाळ्यापासूनच या परिसरामध्ये सातत्याने पाऊस पडत असल्याने द्राक्षकाड्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळालेला नव्हता. द्राक्ष बागांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे द्राक्षघडांची संख्या घटली आहे.
अनेक द्राक्ष बागांना कमी प्रमाणात द्राक्ष घड आल्याने बागा सोडून देण्याची शेतकऱ्यांच्यावर वेळ आली आहे. ज्या द्राक्ष बागांमध्ये द्राक्षघड आहेत, त्या बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड दिसून येत आहे. मात्र सपावसाने द्राक्ष बागेमध्ये पाणी साचून राहत असल्याने औषध फवारणे अवघड झाले असून द्राक्ष बागांचे औषध फवारणीची वेळापत्रक कोलमडले आहे.
सततच्या पावसाचा व ढगाळ वातावरणाचा फटका फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्ष बागांना बसला असून रोगांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यावर्षी खानापूर घाटमाथ्यावरील निर्यातक्षम द्राक्ष बागांचे उत्पन्न घटणार असून द्राक्ष बागायतदारांचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची भीती शेतकऱ्यांच्या मधून व्यक्त होत आहे.
द्राक्ष उत्पादनास फटका
• यावर्षी उन्हाळ्यात पडलेल्या पावसामुळे बागांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, याचा परिणाम द्राक्ष घडांच्या संख्येवर झाला असून गेल्यावर्षीपेक्षा घडांची संख्या कमी आहे.
• सततचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे औषध फवारणे अवघड झाले असून द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार असल्याची भीती पळशी येथील द्राक्ष बागायतदार ज्ञानेश्वर जाधव यांनी व्यक्त केली.
