संदीप कुंभार
मायणी : खटाव तालुका दुष्काळी. पण, या तालुक्यातील शेतकऱ्यांनी कमी पाण्यातही योग्य नियोजन करून द्राक्षांच्या फळबागांत क्रांती घडवली आहे. मायणी परिसरातही ६०० ते ७०० हेक्टरवर द्राक्षबागा आहेत.
येथील शेतकरी दरवर्षी द्राक्ष निर्यातीमधून देशाला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन उपलब्ध करून देत आहेत. तसेच या द्राक्ष शेतीमुळे येथील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तरही उंचावलेला आहे.
खटाव तालुक्यात पाण्याचा दुष्काळ आहे. मात्र, येथील शेतकरी कष्ट करण्यासाठी कधीही मागे पुढे पाहत नाहीत. यामुळेच मायणी भागातील शेतकरीही बागायत शेतीकडे वळला आहे.
यामध्ये प्रामुख्याने कमी पाणी आणि लाखो रुपये मिळवून देणारे फळ म्हणून शेतकरी द्राक्षाकडे वळला आहे.
लागवडीपासून दोन वर्षांच्या कालावधीपर्यंत जोपासना केल्यानंतर पुढील १२ ते १५ वर्षे नियोजन व योग्य औषध फवारणी करून या भागातील शेतकरी दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्नही घेत आहे.
प्रारंभी एक एकर द्राक्ष बाग तयार करण्यासाठी ८ ते १० लाख रुपये खर्च येतो. दोन वर्षांपासून उत्पादन सुरु होते. एक एकर बागेतील उत्पादनातून साधारणतः १० ते २० टन द्राक्षे निर्यात होऊ शकतात.
तसेच निर्यात केलेल्या द्राक्षांना किलोला ८० ते १२० रुपये पर्यंतचा दर मिळू शकतो. त्यामुळे दरवर्षी १० टन द्राक्षाची निर्यात झाली तर शेतकऱ्याला ८ ते १० लाख रुपये एकरी उत्पन्न मिळते.
मायणी भागातील अनफळे, कलेढोण, हिवरवाडी, कान्हरवाडी, निमसोड आदी गावांच्या परिसरातील शेतकऱ्यांचा कल द्राक्षे निर्यात करण्याकडे वाढलेला आहे.
देशांतर्गत व परकीय बाजारपेठेतही मागणी
◼️ द्राक्ष बागेचे योग्य नियोजन केल्यानंतर एकरी २० टनापर्यंत उत्पादन निघू शकते.
◼️ त्यातील साधारण १० ते १२ टन द्राक्षे निर्यात करता येतात.
◼️ याशिवाय देशातील बाजारपेठेमध्येही या द्राक्षांना चांगली मागणी असते.
◼️ प्रतिवर्षी युरोप खंडामध्ये हजारो टन द्राक्षे निर्यात केली जातात.
◼️ निर्यात द्राक्षामधून कोट्यवधी परकीय चलन मिळत आहे.
मागील १५ वर्षांपासून चांगले नियोजन आणि योग्य प्रमाणात औषध फवारणी करून मी युरोपियन खंडामध्ये द्राक्षाची निर्यात करत आहे. साधारण तीन एकर क्षेत्रावर द्राक्ष शेती केली आहे. दरवर्षी एकरी १२ ते २० टनापर्यंत द्राक्ष निर्यात करत आहे. - चंद्रकांत येलमर, द्राक्ष बागायतदार, कान्हरवाडी
अधिक वाचा: दूध उत्पादक महिला सभासदांसाठी नारी सन्मान विमा योजना; किती आणि कशी मिळणार भरपाई?
