मंगळवेढा : पिके कोळपणीला आली; पण सरकारकडून पेरणीसाठी जाहीर केलेल्या अनुदानाचा पत्ता नाही. यामुळे मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे.
अतिवृष्टी, पुराने उद्ध्वस्त झालेली पिके, बिघडलेले अर्थचक्र आणि रब्बी हंगामाची झुंज.. या सर्व पार्श्वभूमीवर शासनाने दिवाळीपूर्वी प्रतिहेक्टर १० हजार रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली होती. मात्र, महिना उलटून गेला तरी निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.
मंगळवेढा तालुक्यातील ५९ हजार ७३० शेतकऱ्यांचे सुमारे ४२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी सोने, दागिने, जनावरे, शेतीनिहाय वस्तू गहाण ठेवून बियाणे विकत घेतले आणि पेरणी केली.
आज पिके कोळपणीच्या टप्प्यावर आली आहेत, मात्र शासनाकडून निधी वितरित न झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
राज्य शासन सांगते की, निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे; तर तालुका प्रशासनाचे म्हणणे आहे, निधी अजून प्राप्त झालेला नाही. या शासन-प्रशासनातील विसंवादामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ आणि ताण वाढला आहे.
शेतकरी वाट बघून थकला
◼️ शेतकरी आता आशेच्या आणि थकव्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे. अनुदान 'आज जमा होईल, उद्या होईल' या आशेवर तो दररोज मोबाईल हातात घेऊन बँक अॅप उघडतो.
◼️ मेसेजचा आवाज आला की क्षणभर मनात आनंद दाटतो 'कदाचित अनुदान आलं असेला' पण काही क्षणातच वास्तव समोर येते, खातं रिकामंच.
◼️ रब्बी पेरणीसाठी जाहीर केलेला निधी अजूनही न आल्याने शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा चालू आहे. जिल्हा प्रशासनाच्या विलंबामुळे शेतकऱ्यांची ही निराशा दिवसेंदिवस अधिक गडद होत चालली आहे.
शासनाने रब्बी पेरणीसाठी जाहीर केलेली मदत आता पिके कोळपणीला आली तरी शेतकऱ्यांच्या हाती मिळालेली नाही. शेतकऱ्यांच्या हक्काची ही मदत येत्या चार दिवसांत न मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. - युवराज घुले, जिल्हा संघटक, स्वाभिमानी शेतकरी संघटना
शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाचा निधी जिल्हा प्रशासनाकडून वर्ग झाल्यानंतर त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, शेतकऱ्यांना काही दिवसांत मदत मिळेल. - शुभांगी जाधव, निवासी नायब तहसीलदार, मंगळवेढा
अधिक वाचा: कोल्हापुरातील शेतकरी संघटनांचे ऊस दर आंदोलन मागे; शेवटी काय झाला निर्णय? वाचा सविस्तर
