वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र बदनापूर यांच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व विशेष कापूस प्रकल्पांतर्गत कापूस प्रक्षेत्र दिवस कार्यक्रमाचे गुरुवार (दि.०८) जानेवारी रोजी गेवराई बाजार (ता. बदनापूर) येथे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक म्हणून विशेष कापूस प्रकल्पाचे उप-प्रकल्प अन्वेषक तथा विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण) डॉ. राहुल कदम, तसेच विषय विशेषज्ञ डॉ. दिपाली कांबळे व डॉ. फारुक तडवी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौजे-गेवराई बाजारच्या सरपंच सौ. मीराताई कारभारी देवकर होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना तज्ज्ञांनी सध्या हवामानातील अनिश्चितता व उत्पादन खर्च वाढल्यामुळे कापूस लागवडीत घट होत असल्याचे नमूद केले. तसेच देशातील कापसाखालील क्षेत्र २०२२-२४ मध्ये १२९ लाख हेक्टर असताना २०२४-२५ मध्ये ते १२५ लाख हेक्टरवर आले आहे. २०२५-२६ मध्येही महाराष्ट्रासह अनेक प्रमुख राज्यांत कापूस लागवडीत घट झाली आहे.
राज्यातील प्रमुख कापूस उत्पादक जळगाव जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये ५.६७ लाख हेक्टर क्षेत्र असताना २०२४-२५ मध्ये ते ५.११ लाख हेक्टर झाले असून २०२५-२६ मध्ये हे क्षेत्र ५ लाख हेक्टरपेक्षा कमी झाले आहे. तर सकारात्मक बाब मांडताना सांगण्यात आले की, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर आणि कृषि विज्ञान केंद्र, बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक वर्ष २०२३-२४ पासून विशेष कापूस प्रकल्प बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद व अंबड या चार तालुक्यांत राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत खरीप-२०२५ मध्ये २१७ शेतकऱ्यांनी एकूण १३६ हेक्टर क्षेत्रावर सघन (Closer Spacing) व अतिघन (High Density) पद्धतीने कापूस लागवड केली आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमात विशेष कापूस प्रकल्पाचे उप-प्रकल्प अन्वेषक डॉ. आर. एल. कदम यांनी ‘दादा लाड तंत्रज्ञानातील त्री-सूत्री’ सविस्तरपणे स्पष्ट केली. त्यामध्ये जमिनीच्या प्रकारानुसार ३ x १ फूट किंवा ३ x ०.५ फूट लागवड अंतर ठेवणे, लागवडीनंतर ४० ते ५० दिवसांत गळफांदी काढण्याचे नियोजन, तसेच पीक ३ फूट उंचीवर आल्यानंतर ७० ते ७५ दिवसांत शेंडा खुडून वाढ नियंत्रित करण्याबाबत मार्गदर्शन केले. अधिक उत्पादनासाठी ३० मायक्रॉन जाडीच्या पॉली मल्च वापराचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपसरपंच बाबासाहेब जोशी, प्रगतशील शेतकरी योगेश भगवान कान्हेरे, गणेश तुकाराम कान्हेरे, गणेश अण्णा लहाने व कृष्णाजी कान्हेरे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यंग प्रोफेशनल-II अजित डाके यांनी केले, तर आभार प्रदर्शन यंग प्रोफेशनल-I अमोल दाभाडे यांनी केले. या कापूस प्रक्षेत्र दिवस कार्यक्रमास परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
