सोलापूर : ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत अतिवृष्टी, महापुराने झालेले पीक नुकसान तसेच जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांच्या १५ लाख ४० हजार २५० शेतकरी खात्यांसाठी १,६३६ कोटी ८२ लाख रुपये मंजूर झाले.
त्यापैकी शेतकऱ्यांच्या तीन लाख ४८ हजार खात्यांची २७७ कोटी १६ लाख रुपये इतकी रक्कम खात्यावर जमा झाली नाही. खातेदार मयत, बँक खाती जुटी, तसेच ई-केवायसी नसल्याने साडेतीन लाख शेतकऱ्यांची रक्कम जमा होण्यास अडथळे येत आहेत.
जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवेळी पावसानेही उभ्या पिकांचे नुकसान झाले होते. पीक नुकसानीचे पंचनामे केल्याने जिल्ह्यासाठी नुकसानभरपाई मंजूर झाली आहे.
त्यानंतर ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील १० मंडळांत अतिवृष्टी झाली होती. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात प्रामुख्याने, तसेच इतर तालुक्यांतही कमी प्रमाणात नुकसान झाले होते.
सप्टेंबर व ऑक्टोबर महिने मात्र पिकांची जमिनीची मोठी हानी करून गेले. अतिवृष्टी तर दररोज होत होती, शिवाय महापुरात जमीन खरडून वाहून गेली. कधी नव्हे इतका पाऊस पडला व शेती पिकांना नुकसान पोहोचले. बरीच खरीप पिके वाहूनही गेली.
ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत शेतकऱ्यांच्या १५ लाख ४० हजार २५० खात्यांसाठी १६३६ कोटी ८२ लाख २९ हजार २३५ रुपये मंजूर झाले आहेत. ही रक्कम १३ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली ती आजही जमा होत आहे.
जमीन खरडून गेलेली रक्कम सोडली तर उर्वरितपैकी तीन लाख ४८ हजार शेतकऱ्यांची २७७ कोटी १६ लाख १२ हजार रुपये इतकी रक्कम अद्यापही खात्यावर जमा झाली नाही.
६९ लाख रुपये पेंडिंग
◼️ शेतकऱ्यांनी दिलेली बँक खाती अगोदर तपासली जातात, तपासणीत त्रुटी आल्याने काही खात्यांची तपासणीही झाली असली तरी त्रुटी पूर्ण झाल्या नाहीत.
◼️ याशिवाय ई-केवायसी पूर्ण न झाल्यानेही साडे बावीस हजार खात्यांची ६९ लाख रुपये इतकी रक्कम पेंडिंग आहे.
◼️ ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व महापुराने झालेल्या पीक नुकसानीत ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत त्यांनाच रब्बी पेरणीसाठी हेक्टरी १० हजार रुपये मंजूर झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची संख्या दुप्पटीपर्यंत गेली आहे.
अधिक वाचा: तुमच्या रेशनकार्डवर 'हा' नंबर असेल तर तुम्हाला मिळणार आता आयुष्मान कार्ड; वाचा सविस्तर
