शिरूर तालुक्यातील रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात असलेल्या ऊस पिकाचे इतर कारखान्यांना किंवा गुऱ्हाळाला गाळप करणे आवश्यक आहे.
जो कारखाना सर्वप्रथम ऊस तोडणी करतो, त्या कारखान्याला शेतकरी ऊस देणे पसंत करतात; परंतु चांगल्या बाजारभावामुळे ऊस उत्पादक शेतकरी गुऱ्हाळाला ऊस देणे पसंत करत आहेत.
दौंड तालुक्यातील कारखान्यांनी उसाला हप्त्यापोटी पहिली उचल ३१०० रुपये जाहीर केल्यामुळे गुऱ्हाळचालक चिंतेत पडले होते; कारण कमी किमतीत गुऱ्हाळासाठी कोणी शेतकरी ऊस देईना.
शिरूर तालुक्यातील बहुतांश ऊस श्रीगोंदा, दौंड, श्रीनाथ म्हसोबा, भीमा पाटस, अनुराज शुगर, व्यंकटेश कृपा, पराग भीमाशंकर, बारामती इंदापूर तालुक्यातील साखर कारखान्यांना जात आहे.
कारखाने जोमात सुरू असल्याने गुऱ्हाळे बंद पडण्याच्या मार्गावर होती. पुण्यात सर्वाधिक गुऱ्हाळे असलेला दौंड तालुका कृषी नकाशावर ठळकपणे अधोरेखित आहे आणि त्याच खालोखाल शिरूर तालुक्यात गुऱ्हाळांची संख्या जास्त आहे.
शिरूर, दौंड तालुक्यांत जवळपास ५०० ते ५५० गुऱ्हाळे आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखाना व खासगी दौंड शुगर, श्रीनाथ म्हस्कोबा, बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, दि माळेगाव सहकारी साखर कारखाना, बारामती अॅग्रो या कारखान्यांना शेतकरी ऊस देत आहेत.
इंदापूर तालुक्यातील निरा भीमा सहकारी साखर कारखाना, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर, कर्मयोगी शंकरराव पाटील, श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, भीमाशंकर; पराग, जुन्नर तालुक्यातील विघ्नहर, शिरूर तालुक्यातील वेंकटेश शुगर या कारखान्यांना शेतकरी ऊस देत आहेत.
३५०० रुपयांप्रमाणे ऊसतोडणी सुरू
◼️ पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने बाजारभाव देण्यासाठी स्पर्धा करत आहेत.
◼️ गुऱ्हाळ चालकांनी उसासाठी प्रतिटन ३५०० रुपयांप्रमाणे ऊसतोडणी सुरू केली आहे.
◼️ राज्य बाजारभावामुळे साखर कारखान्यांना महिनाभर ऊस पुरेल की नाही याबद्दल शंका आहे.
◼️ अनेक शेतकऱ्यांनी साखर कारखान्याकडे ऊसतोड बंद करून गुऱ्हाळाला ऊस देण्यास पसंती दर्शवली आहे.
कारखानदारांनी २०२५-२६ हंगामासाठी पहिली उचल हप्ता पोटी ३१०० रुपये जाहीर केल्यामुळे गुऱ्हाळचालकांनी ३५०० रुपये बाजारभाव केला आहे. या कारखानदार आणि गुऱ्हाळचालक यांच्यातील स्पर्धेमुळे शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळत असून या वर्षी शेतकरी वर्गाला उसाला उच्चांकी दर मिळाला आहे त्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी आहे. - राहुल लोखंडे, रुक्मिणी पांडुरंग गूळ उद्योगसमूह
खासगी व सहकारी साखर कारखान्यांपेक्षा खासगी गुऱ्हाळघरे शेतकऱ्यांना प्रतिटन ३५०० बाजारभाव देत आहेत. या भागातील ऊस रसवंतीसाठी बाहेरील राज्यात मोठी मागणी आहे, त्यामुळे उसाला या उन्हाळ्यात प्रतिटन ४००० रुपये दर मिळणार आहे. - अमोल रणदिवे, ऊस उत्पादक शेतकरी
अधिक वाचा: शेतजमिनींच्या पोटहिश्श्यांच्या मालकी हक्काबाबतचे वाद आता मिटणार; सुरु होतोय 'हा' पथदर्शी प्रकल्प
