मांजर्डे: सांगली जिल्हा हा द्राक्षपंढरी म्हणून पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातून परदेशात युरोप, चीन, रशिया, दुबई, सौदी अरेबिया या देशात प्रचंड मागणी आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत आहे.
तासगाव, मिरज, खानापूर, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यांतून युरोप व दुबईला पाठविली जाणारी निर्यातक्षम द्राक्षे तयार केली जातात. यावर्षी मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष उत्पादक संकटात सापडला आहे.
निर्यातक्षम द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात
- मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात द्राक्ष निर्यात करण्याचे प्रमाण कमी आहे. निर्यातक्षम द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे.
- अवकाळी पाऊस आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा द्राक्षाची निर्यात घटल्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
- डिसेंबरअखेरीस युरोपियन व इतर देशात निर्यातीस सुरुवात होते.
- जानेवारीपासून जिल्ह्यातील द्राक्ष युरोपियन देशातील बाजारपेठेत पोहोचण्यास सुरुवात झाली.
सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीचा अहवाल (जानेवारी २०२५ ते १५ मार्च अखेरचा अहवाल)
देश | कंटेनर | मेट्रिक टन |
कॅनडा | ४ | ६६.४६ |
चीन | ५८ | ७११.१४३ |
डेन्मार्क | २७ | ३४१.६४ |
जर्मनी | ४ | ५९.७५ |
हाँगकाँग | ७ | ७६.०८ |
इंडोनेशिया | ३ | ५३.५७७ |
आयर्लंड | ६ | ७८८ |
इटली | १ | १३९ |
मलेशिया | १४ | १८०.५ |
नेदरलँड्स/हॉलंड | २९२ | ३,८९३.८६ |
नॉर्वे | १ | १,३१२ |
ओमान | ५ | १११.७१ |
कतार | ७ | ९८.७८ |
रोमानिया | ६ | ७३.६६ |
रशियन फेडरेशन | १७ | ३२८.२७ |
सौदी अरेबिया | ११३ | १७३०.७२ |
सिंगापूर | १ | १६.६५ |
स्पेन | २० | २५९.४८ |
तैवान | ४ | ५२ |
थायलंड | ४ | ५२.५ |
संयुक्त अरब अमिरत | १४४ | २,१३२.९१ |
युनायटेड किंग्डम | ११२ | १,५५१.२३ |
एकूण | ८५१ | ११,८९४.८६ |
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी कमी असल्याने, तसेच पावसामुळे शेतकरी अडचणीत आल्याने उत्पन्न कमी झाले आहे. शेतकऱ्यांचा निर्यातीकडे कल कमी राहिला. - मनवेश चेछानी, जनरल मॅनेजर, काल्या एक्सपोर्ट नाशिक
जिल्ह्यातून यंदा आजपर्यंत ८५१ कंटेनरमधून ११ हजार ८९४ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. गतवर्षी १११४ कंटेनरची १५ हजार ५४६ मेट्रिक टन परदेशात द्राक्षे निर्यात झाली होती. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील १० हजार १६५ टन द्राक्ष उत्पादनाची नोंदणी झाली. अवकाळीमुळे यावर्षी वजन व उतारा कमी झाल्याने निर्यात कमी झाल्याचे दिसून येत आहे. अजून किती वाढ होईल ते महिन्याभरात स्पष्ट होईल. - विवेक कुंभार, जिल्हा कृषी अधिकारी
अधिक वाचा: दुष्काळी माळरानावर सात एकर पेरूची लागवड करत उत्पन्नात मारली कोटीकडे मजल; वाचा सविस्तर