सोलापूर : पावसाचे पाणी जमिनीत मुरून जमिनीखाली पाण्याची पातळी वाढावी, यासाठी राज्य शासन प्रत्येक गावात जलतारा प्रकल्प राबविणार आहे.
या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ५० हजार ९०१ शेतकऱ्यांना 'जलतारा' (शोष खड्डा) अंतर्गत शेतात पाच बाय पाच अन् सहा फूट खोल असा खड्डा मारण्यासाठी प्रत्येकी ४ हजार ८०० रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
जिल्ह्यातील १० हजार २३ गावांमध्ये प्रत्येकी ५० जलतारा देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांनी दिली.
जलतारा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना पाण्याची समस्या दूर होते आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला मदत होते. या प्रकल्पामुळे भूजल पुनर्भरण वाढते आणि पाण्याची पातळी वाढते.
जिल्ह्यात यंदा ५० हजार ९०१ शेतकऱ्यांच्या शेतात जलतारा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. कृषी विभागाकडून हा प्रकल्प राबवला जाणार असला तरी रोजगार हमी योजनेकडून जलतारा कामांचे नियोजन होणार आहे.
यासाठी २४ कोटी ४३ लाख २५ हजार ८०० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. सध्या २४९ जलतारा प्रकल्प पूर्ण झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी मरोड यांनी दिली.
जलतारा प्रकल्पाचे फायदे
- शेतात पाण्याची पातळी वाढते.
- शेतात पाणी साचण्याचे प्रमाण कमी होते.
- यामुळे पिकांचे नुकसान टाळता येते.
- शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये पाणी टिकून राहते आणि ते पाणी शेतीसाठी उपयुक्त ठरते.
- या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते.
शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार आम्ही शेतकऱ्यांना प्रोत्साहन करत आहोत. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यावा. - अंजली मरोड, उपजिल्हाधिकारी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, सोलापूर
अधिक वाचा: खोडवा उसाचे पिक घेतल्याने उत्पादन खर्चात कशी होते मोठी बचत? वाचा सविस्तर