देवगड : देवगड हापूस आंब्याच्या उत्तम गुणवत्तेमुळे मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. देवगड हापूस आंबा विक्री करताना आता जे महत्त्वाचे संकट आहे ते म्हणजे इतर भागातील, राज्यातील आंबा हा देवगड हापूसच्या नावाखाली मुंबई, पुणे, सांगली व अन्य भागांतही मोठ्या प्रमाणावर विक्री केला जातो.
देवगड हापूसच्या नावाखाली होणाऱ्या बोगस आंबा विक्रीला पायबंद बसणार, २ जानेवारी २०२५ रोजी, सकाळी १० वाजता, मोरेश्वर जनार्दन गोगटे सांस्कृतिक भवन जामसंडे, येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
देवगडमध्ये होणाऱ्या एकूण आंबा उत्पादनाच्या कितीतरी पटीने देवगड हापूस आंब्याची बोगस विक्री बाजारपेठेत होत असते. मग हा आंबा येतो कुठून तर कर्नाटक, बंगळुरू, गुजरात व अन्य सीमावर्ती भागातून येतो.
याला पायबंद करण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने अनेक वर्षे झगडून जीआय मानांकन प्राप्त केले आणि जीआयधारक शेतकऱ्यांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत. परंतु नुसते जीआय मानांकन घेऊन हा प्रश्न सुटणार नाही.
यासाठी संस्थेने देवगड हापूस नावाने विकल्या जाणाऱ्या प्रत्येक आंब्यावर यूआयडीप्रमाणे एक युनिक कोड असणारा स्टीकर लावण्याची सिस्टम विकसित केलेली आहे.
तरी या युनिक कोड स्टीकरचा वापर शेतकऱ्यांनी केल्यास, देवगड हापूसच्या नावाखाली अन्य भागातील जो आंबा विक्री केला जातो आणि पर्यायाने देवगड हापूसला कमी भाव मिळतो, त्याला कुठेतरी आळा बसेल.
यावेळी संबंधित विषयाशी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व बागायतदार, विक्रेते, शेतकरी बंधू- भगिनींनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अॅड. अजितराव गोगटे यांनी केले आहे
अधिक वाचा: Amba Mohor Sanrakshan : आंबा पिकातील रसशोषक किडी व रोगांचे नियंत्रण करण्यासाठी कशा घ्याल फवारण्या?