पलूस : घाटामाथा व कोकण पट्टयातील शिराळा मलकापूर, शाहूवाडी तालुक्यातील लाखो टन शेणखताला पलूस तालुक्याबरोबर तासगाव, कडेगाव, खानापूर तालुक्यातून मागणी वाढली आहे.
द्राक्षेशेती व ऊस, फूल, फळ व भाजीपाल्याच्या उत्पादन वाढीसाठी, जमिनीचा पोत सुधारून उत्तम आरोग्यासाठी ही शेणखत वरदान ठरत आहे.
यामुळे लाखो हेक्टर शेतीतशेतकरी दरवर्षी शेणखताचा वापर करताना दिसत असल्याने शेणखताला मागणी वाढली आहे.
सध्या शेणखताच्या एका ट्रॉलीचा दर ५ ते ६ हजार तर दोन ट्रॉलीसाठी ९ हजार ते १० हजारांवर दर पोहचला आहे. सध्या पुढील हंगामासाठी शेतीची मशागत करून शेती तयार करण्याचे काम सुरु आहे.
दुसरीकडे द्राक्षे हंगाम संपत आला असून, बऱ्यापैकी बागा उत्पादन घेऊन रिकाम्या झाल्या आहेत. पुढच्या वर्षीच्या पिकाचे उत्पादन वाढीसाठी शेतकरी शेतात एकरी ७ ते १० ट्रॉली शेणखत वापरत आहेत.
रासायनिक खताच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत त्याला पर्याय म्हणून शेतकरी नैसर्गिक व पारंपरिक शेणखताची मात्रा वाढवताना दिसत आहे.
बहुतांश शेतकरी जोडव्यवसाय म्हणून पशुधनाकडे वळला असला तरी घाटमाथा व कोकण परिसरात उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पशुपालन केले जाते. हेच लोक या पशुधनापासून खत निर्मिती करून मोठे उत्पन्न काढताना दिसत आहेत.
शेतकरीराजा घाटमाथ्यावर जनावरे चरवून गोठ्यातील शेण उकिरड्यात साठवणूक करतात. यातील शेणखत स्वतः वापरतात. कमी पडलेले शेणखत कोकणातून येते. यातून पशुधन मालकाला चांगले पैसे मिळत असले तरी शेत जमिनीसाठी शेण वरदान आहे. - संपतराव जाधव, शेतकरी, आंधळी
अधिक वाचा: जिल्हा मध्यवर्ती बँकांना केंद्र सरकारचा मोठा झटका; आता 'त्या' संचालकांना कायमचे घरी बसावे लागणार
