राजाराम लोंढे
कोल्हापूर : मागील सात-आठ वर्षांत बगॅसला कोणी विचारत नव्हते. केवळ दीडशे रुपये टनानेही कोणी खरेदी करत नव्हते. मात्र, सहवीज प्रकल्पांच्या उभारणीसह उसाच्या कमतरतेमुळे यावर्षी बगॅसला चांगली मागणी आहे.
सोलापूरसह मराठवाड्यात तीन हजार रुपये, तर पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांना २५०० रुपये टनप्रमाणे दर मिळत आहे. बगॅसला मिळालेल्या वाढीव दरातील शेतकऱ्यांच्या पदरात किती पैसे पडणार? याचीच उत्सुकता आहे.
उसापासून साखरेबरोबर बगॅस, मोलॅसिस, इथेनॉल असे इतर उपपदार्थही तयार होतात. त्यातील सगळ्यात स्वस्त विक्री होणारा बगॅस होता. सात-आठ वर्षांपूर्वी बगॅस म्हणजे साखर कारखानदारांची डोकेदुखी व्हायची.
त्याची साठवणूक कोठे करायची? तो वेळेत हलवला नाही तर गाळप थांबायचे. त्यामुळे अवघ्या दीडशे ते दोनशे रुपये टनने विक्री केली जायची. मात्र, साखर कारखान्यांनी सहवीज प्रकल्पाची उभारणी केली आणि बगॅसचा भाव वाढत गेला.
सध्या बाजारात साखरेचा किमान हमीभाव प्रति क्विंटल ३१०० रुपये आहे आणि बगॅस तीन हजार रुपयांपर्यंत विक्री होत आहे. साखर कारखानदारांच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे.
दीड महिन्यात हजार रुपयांची वाढ
यंदाचा हंगाम सुरू करण्यापूर्वी बगॅसचा दर १५०० ते १६०० रुपये प्रतिटन होता. मात्र, उसाचे उत्पादन घटल्याने बगॅसही कमी मिळणार आहे. त्यामुळे दीड महिन्यात टनामागे एक हजार रुपयांची वाढ झाली आहे
यासाठी वापरला जातो बगॅस
- प्लायवूड तयार करण्यासाठी.
- वस्त्रोद्योगात बॉयलरचे इंधन म्हणून वापर.
- साखर कारखान्यांच्या डिस्टिलरी प्रकल्पासाठी.
- विटा तयार करण्यासाठी.
- सहवीज प्रकल्पासाठी.
अशी होते बगॅसची निर्मिती
जुन्या पद्धतीचा बॉयलर असेल तर ५ टक्के व अद्ययावत मशिनरी असलेल्या कारखान्यात ९ टक्क्यांपर्यंत बगॅस मिळतो. कोल्हापूर जिल्ह्याचे गाळप पाहिले तर वर्षाला १० लाख ५० हजार टन बगॅसची निर्मिती होते.
साखरेबरोबर उपपदार्थांना चांगला भाव मिळाला तरच साखर कारखानदारी टिकणार आहे. बगॅसच्या दरात वाढ झाली ही वस्तूस्थिती आहे. पण, तो वापरून तयार केलेल्या विजेचा दर सरकारने कमी केला आहे. पूर्वीप्रमाणे प्रति युनिट दीड रुपया सरकारने अनुदान दिले तर शेतकऱ्यांना चार पैसे मिळू शकतात. - पी. जी. मेढे, साखर उद्योगातील अभ्यासक
अधिक वाचा: साखरेच्या दरात मोठी वाढ; कारखाने शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जादा दर देणार?