मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केल्यास गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची लागवड १ ननंतरच करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर २०२५-२६ या हंगामासाठी शेतकऱ्यांना बीटी बियाण्यांचे वितरण १५ मे नंतरच करण्यात येणार आहे.
राज्यात दरवर्षी सुमारे ४० लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड केली जाते. हा आकडा वर्षानुसार थोडाफार बदलत असतो. वाशिम जिल्ह्यातही कपाशीचे क्षेत्र लक्षणीय असून, साधारणतः २९ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात कपाशीची लागवड केली जाते. सन २०१७ मध्ये राज्यात गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
त्यानंतरही या कीडचा प्रादुर्भाव सातत्याने जाणवत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कृषी विभागामार्फत विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्यानुसार, शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२५-२६ साठी दि. १५ मे नंतरच कपाशीच्या बियाण्यांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना १ जूननंतरच पेरणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाची कारणे
कपाशीची फरदड घेणे, त्यानंतर पूर्वहंगामी कापूस लागवड अशा प्रकारे पीक सतत शेत परिसरामध्ये उपलब्ध असल्याने या किडीसाठी खाद्याची उपलब्धता वर्षभर होत राहते. त्यातून बोंड अळीची उत्पत्ती वाढत राहते.
यंदाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना १५ मेनंतर बाजारात कापसाची बियाणे मिळतील. या संदर्भात शासन स्तरावरुन सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्वहंगामी कापसाची लागवड न करता शेतकऱ्यांनी १ जूननंतरच लागवड करावी. - संतोष वाळके, उपविभागीय कृषी अधिकारी, वाशिम.
असे आहे बीटी बियाणे वितरणाचे नियोजन
• १ मे ते १० मे : उत्पादक कंपनी ते वितरक
• १० मे पासून : वितरक ते किरकोळ विक्रेते
• १५ मे पासून : किरकोळ विक्रेते ते शेतकरी
• प्रत्यक्ष लागवड : १ जून नंतर
नियंत्रणासाठी हे करा!
• गत हंगामातील पिकांचे अवशेष व्यवस्थित नष्ट करणे.
• पूर्वहंगामी कपाशी लागवड करण्याचे टाळणे.
• नवीन लागवड ही जून महिन्यांमध्ये ८०-१०० मिमी पाऊस झाल्यानंतरच करणे.
पूर्वहंगामी लागवड केल्यास गुलाबी बोंड अळीच प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या पृष्ठभूमीवर शासनानेच यंदा शेतकऱ्यांना १५ मे नंतर बियाणे वितरणाच्या सुचना दिल्या असून, किरकोळ विक्रेत्यांना १० मे पासून बियाणे उपलब्ध होतील. - अभिजीत देवगिरकर, कृषी विकास अधिकारी, वाशिम.