आयुब मुल्ला
खोची : यांत्रिकीकरण योजनेतून शेतीची अवजारे घेण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग पूर्व संमती देण्यात मागे पडत चालला आहे. याबाबतची पूर्वसंमती देणारे अॅप्लिकेशन अप्रूव्हड हे टॅबच बंद पडले आहे.
विशेष म्हणजे बिल सादर करून घेणारे टॅब चालू, पण अवजारे साहित्य खरेदी करण्यास मंजुरी देणारे टॅब बंद पडणे हा विरोधाभास आहे. दुसरीकडे या शेतकऱ्यांना अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकरी वैतागून गेला आहे.
कृषी यांत्रिकीकरण योजनेतून अनुदानावर शेतकऱ्यांना शेती अवजारांचे वाटप केले जाते. कोळप्यापासून ते हार्वेस्टिंग यंत्रापर्यंत विविध अवजारे दिली जाणारी ही महत्त्वपूर्ण योजना शेतकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे.
ट्रॅक्टर, ट्रॉली, पलटी, पॉवर टिलर, हार्वेस्टर, मळणी मशीन, चापकटर अशा शेतीपूरक यंत्रांचे वाटप मोठ्या प्रमाणात केले आहे. कोल्हापूर जिल्ह्याला तर या योजनेसाठी १९ कोटी २६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
त्यापैकी १४ कोटी रुपये मिळाले असून १३ कोटी ३३ लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना दिले आहे. सुमारे चार हजार शेतकऱ्यांनी योजनेतून लाभ मिळविला आहे.
मुळातच जिल्ह्यातील ४८ हजार ३७२ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ४५ हजार १३७ लाभार्थी निवडण्यात आले. निवड झालेल्या १४ हजार ३०५ शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड केली.
त्यापैकी १२ हजार ५४० शेतकऱ्यांना खरेदीसाठी पूर्व संमती दिली गेली. त्यामधील ७ हजार ४४९ शेतकऱ्यांनी खरेदी केलेली कागदपत्रे अपलोड केली. हे खरेदीचे टॅब महाडीबिटी पोर्टलवर उत्तमपणे सुरू आहे.
परंतु, जे शेतकरी यंत्रे घेण्यासाठी इच्छुक आहेत. ज्यांची निवड झाली आहे, अशा शेतकऱ्यांना मात्र यंत्र खरेदीचे धाडस होईना. कारण त्यांना खरेदीची पूर्व संमतीच मिळेनाशी झाली आहे.
गाव पातळीवर काम करणारे सहायक कृषी अधिकारी यांच्याकडे १ हजार ४५ तर तालुका कृषी अधिकारी यांच्या लॉगिनला ७२० असे एकूण १ हजार ७६५ प्रस्ताव मंजुरीवना पडून आहेत. त्यांना मजुरी देताच येत नाही. कारण टॅब बंद आहे.
मंजुरी कधी मिळणार अशी विचारणा कृषी विभागाकडे करू लागले आहे, तांत्रिक कारण पुढे केले गेल्याने अडचण येत आहे.
अधिक वाचा: राज्य शासनाच्या 'या' योजनेतून मिळणार मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण; कुठे आणि कसा कराल अर्ज?
