रमेश सुतार
गणेशवाडी : कमी जागेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेता येते याचे उत्तम उदाहरण गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील प्रवीण बोरगावे यांनी दाखवून दिले आहे.
बी.एस्सी. पदवीधर असलेल्या प्रवीणने ढब्बू मिरचीच्या लागवडीतून चार एकर शेतीमध्ये चाळीस लाखांपर्यंत उत्पन्न घेतले आहे. एकीकडे शेती करणे अवघड बनले असताना प्रवीणने शेतकऱ्यांसमोर कृतीतून आदर्श निर्माण केला आहे.
प्रवीण बोरगावे यांनी कलर कॅप्सिकम म्हणजेच लाल, पिवळ्या रंगाच्या ढब्बू मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. चार एकरात पॉलिहाऊस शेतीतून १५० टनाचे कॅप्सिकम उत्पादन घेतले आहे.
प्रतिकिलो ८० रुपये दराने ८० लाखांपर्यंत उत्पन्न मिळाले. खर्च ४० लाख रूपये वजा जाता निव्वळ नफा ४० लाख रुपये मिळाला आहे. याआधी २२ वेगवेगळ्या विदेशी भाज्यांची लागवड त्यांनी केली होती.
लावणीनंतर तीन महिन्यांनी तोडणी सुरू झाली आहे. कॅप्सिकम (ढब्बू मिरची) हैदराबाद, मुंबई, पुणे, नागपूर, गोवा अशा मेट्रो सिटीत पाठविला जातो.
सद्यस्थितीला ८० रुपये किलो दराने ढब्बू विकला जात आहे. उसाबरोबरच अन्य पिके घेताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. या काळात बोरगावे यांचा आदर्श घेण्याची गरज आहे.
बाजारात उत्पादित मालाला दर किती मिळतो हे न पाहता आपल्या शेतीमधून जास्तीत जास्त उत्पादन घेणे हेच आजच्या काळात शहाणपणाचे आहे. ऊस, केळी या नगदी पिकांसोबतच इतर पर्याय म्हणून पॉलिहाऊसमधून उत्पादन चांगले मिळू शकते. - प्रवीण बोरगावे, शेतकरी
अधिक वाचा: दुष्काळी माळरानावर सात एकर पेरूची लागवड करत उत्पन्नात मारली कोटीकडे मजल; वाचा सविस्तर