दिवाळीच्या आनंदाच्या क्षणी निसर्गाने मात्र द्राक्ष बागायतदारांची सत्त्वपरीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या सुरू असलेल्या प्रतिकूल हवामानामुळे मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांचा दिवाळीचा काळ औषध फवारणीतच जात आहे. ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस आणि थंड हवामानामुळे उरल्यासुरल्या द्राक्षबागांचे भविष्य अंधकारमय बनले आहे.
सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यात सुमारे २७ हजार हेक्टर क्षेत्र द्राक्षबागायतीखाली असून बहुतांश बागांमध्ये फळ छाटणी पूर्ण झाली आहे. परंतु अवकाळी पावसामुळे द्राक्ष पानांवर दावणी रोगाने विळखा घातला आहे. त्यामुळे 'बुडत्याचा पाय खोलातच' या म्हणीप्रमाणे द्राक्ष उत्पादकांना दिवाळीतच संकटाचा सामना करावा लागत आहे.
दिवाळीच्या सकाळी उटण्याऐवजी हातात फवारणीचे पंप आणि अंगावर औषधांचे शिंतोडे अशीच दृश्ये सध्या द्राक्षबागांमध्ये दिसत आहेत. फळधारणा आधीच कमी झालेली असताना, उरलेली घडं वाचवण्यासाठी शेतकरी प्रचंड मेहनत घेत आहेत. मात्र पावसाचा आणखी तडाखा बसल्यास द्राक्षबागायतदारांचा दिवाळीचा गोडवा कमी होईल की काय?, अशी भीती व्यक्त होत आहे.
