गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. यावर्षीही मोठी भाववाढ झाल्याने पुन्हा चिंतेत भर पडली आहे.
आगामी हंगामात नियोजन करताना शेतकऱ्यांना नाकीनऊ येत आहे. ताळमेळ जुळत नसल्याची शेतकऱ्यांनी व्यथा मांडली. अलीकडच्या काळात उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांसाठी रासायनिक खते महत्त्वाचा भाग बनला आहे.
ही गरज लक्षात घेता शासनाकडून रासायनिक खतांचे भाव गेल्या अनेक वर्षांपासून सतत वाढताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
दुसरीकडे उत्पादन खर्चानुसार भाव मिळत नसल्याने संपूर्ण अर्थचक्रच शेतकऱ्यांचे कोलमडले आहे. हंगामापूर्वीच खतांच्या किमती वाढल्याने गोणीमागे २००-२५० रुपयांची वाढ झाली आहे.
सुरू होत असलेल्या हंगामात खताच्या किमती अस्मानाला भिडल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार असून, उत्पादन खर्चात भर पडणार आहे.
एकीकडे शेतीमालाला भाव मिळत नसताना खते व कीटकनाशकांच्या किमती दरवर्षी वाढत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.
खताच्या जुन्या व नवीन दरांमध्ये मोठी तफावत असून, शेतकऱ्यांना २०० ते २५० रुपये अधिकचे मोजावे लागत आहेत. उन्हाळी कांदा व इतर पिकासाठी लागणारा रासायनिक खतांचा डोस देखील आवश्यकच असतो.
त्यामुळे शेतकरी सध्या खत खरेदी करण्यासाठी दुकानात जात आहेत. तेव्हा खतांच्या किमती वाढल्याचे विक्रेते सांगत आहेत. तालुक्यातील शेतकरी कांदा पिकाला प्राधान्य देत आहेत.
नाराजीचा सूर
◼️ सध्या कांद्यासाठी एकरी चार बॅग रासायनिक खत लागत असून खतांच्या किमतीमध्ये प्रतिगोणी २०० ते २५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.
◼️ एकीकडे शेतमालास भाव मिळत नसताना खते व कीटकनाकशकांच्या किमती वाढत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत असल्याचे जुन्नर तालुक्यातील खत विक्रेते यांनी सांगितले.
| खत प्रकार | जुना दर (₹) | नवा दर (₹) | वाढ (₹) |
|---|---|---|---|
| 10:26:26 | १८५० | २१०० | २५० |
| 24:24:0 | १७०० | १९०० | २०० |
| 20:20:0 | १३०० | १६५० | ३५० |
| 14:35:14 | १८०० | १९७५ | १७५ |
| पोटॅश | १७०० | १९०० | २०० |
काय पिकवावे... काय नको.... शेतकऱ्यांपुढे यक्ष प्रश्न असून १ वर्षापासून सोयाबीन, कांद्याचे भाव देखील घसरलेले आहेत. सोयाबीनच्या दराची तीच अवस्था झाली आहे. त्यामुळे आता नेमके पिकवावं काय, हा यक्षप्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे आणि रासायनिक खताचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत. - सीताराम डुंबरे, शेतकरी
अधिक वाचा: ऊस तुटून गेल्यावर पाचट जाळण्यापेक्षा त्यावर 'ही' प्रक्रिया करून बघा; होतील असंख्य फायदे
