चाकण : मुलगा पुणे-मुंबईचाच हवा, नोकरी करणार हवा, स्वतःचा फ्लॅट असणार आणि शेतीही आवश्यकच अशा अनेक अटी आज लग्न करताना ग्रामीण भागातील मुलींकडून घातल्या जात आहेत.
यामुळे पुणे जिल्ह्यातील उच्चशिक्षित प्रगतिशील शेतकरी मुलांची लग्न ठरणे कठीण झाले आहे. तिशी ओलांडली तरी मुलगी मिळत नसल्याने शेतीचे लाखो रुपयांचे उत्पन्न सोडून शहरात १०-१५ हजारांची नोकरी या तरुणांना करावी लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
ग्रामीण भागात किमान पुणे जिल्ह्यात तरी आज बहुतेक सर्वच तालुक्यांत अनेक शेतकरी कुटुंबांत उच्चशिक्षित प्रगतिशील शेतकरी मुले आज नोकरीपेक्षा अधिक पैसे कमावतात. तरी देखील अशा शेतकरी मुलांची लग्न होणे कठीण झाले आहे.
लग्नासाठी मुलाची आर्थिक मिळकत पाहूनच रेशीमगाठी बांधल्या जातात; परंतु कोरोनानंतर अनेक तरुण बेरोजगार झालेल्या तरुणांना अखेर गावाने, शेतीनेच साथ दिली. ही वस्तुस्थिती असताना शेती करणाऱ्या मुलाला कुणीच मुलगी द्यायला तयार नाही.
५० टक्के तरुण तिशीपार
ग्रामीण भागातील काही वधू-वर सूचक केंद्रांमध्ये चौकशी केली असता आज शेकडो मुलांनी तिशीपार केली असल्याचे समोर आले. शेतकरी मुलांशी लग्न करण्यास मुली तयार होत नसल्याने ही अडचण येत आहे. यामुळे वधू-वर सूचक केंद्रांमध्ये नाव नोंदवून देखील शेतकरी मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे.
वकिलाला वकील, डॉक्टरला हवा डॉक्टर
काही वर्षात मुला-मुलींना वकील असेल तर वकील, डॉक्टर असेल तर डॉक्टर नवरा, नवरी हवी; पण थोडं शिक्षण झाले, नोकरी नाही, आई-वडिलांकडे शेतात काम पण केले; पण अशा मुलींना देखील आता शेतकरी नवरा नको आहे. आई-वडिलांनी शेतीत काम केले तेच आपण करणार नाही असे सांगत चांगल्या, उच्चशिक्षित शेतकऱ्यांना देखील मुली लग्नासाठी नकार देत आहेत.
जिल्ह्यात आज एक-दोन एकर शेती असलेले उच्चशिक्षित तरुण चांगल्या आधुनिक पद्धतीनुसार शेती करून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत; पण अशा उच्चशिक्षित, प्रगतिशील शेतकरी मुलांचे देखील लग्न होणे कठीण विषय बनला आहे. मी इंजिनिअर असून, नोकरीऐवजी शेती करतो व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढीसाठी कंपनी स्थापन करून मदत करतोय. माझ्या कंपनीत आज मी १०-१५ मुलांना नोकरी दिली. तरी लग्न ठरवताना मुली नोकरी आहेत का विचारतात. - सिद्धेश साकोरे, तरूण
अधिक वाचा: राधानगरी तालुक्यातील या तीन जावांची चर्चा भारी; उसाच्या पट्ट्यात केली झेंडूची शेती