पीएम किसान व नमो सन्मान योजनेत नवीन नोंदणी करण्याकरिता शासनाकडून काही नियम घालण्यात आले आहेत. यात नवीन शेतजमीन खरेदी केली असेल तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो का?
यात पीएम किसान योजनेच्या नवीन नियमावलीत वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी २०१९ नंतर जमीन खरेदी केली असेल, त्यांना शेतकरी म्हणून योजनेचा लाभ घेता येणार नाही.
तसेच पीएम किसान योजनेसाठी नोंदणीवेळी पती, पत्नी व मुलांची आधारकार्ड जोडावी लागणार आहेत. केंद्र शासनाने २०१९ मध्ये शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरू केली. त्यातून शेतकऱ्यांना तीन हप्त्यात वर्षाला एकूण ६,००० रुपये दिले जातात.
महाराष्ट्र शासनानेही नमो सन्मान योजनेतून सहा हजार रुपये देण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी म्हणून कुटुंबातील पती किंवा पत्नी यापैकी एकाला व २०१९ पूर्वी जमीन नोंद असेल, तर १८ वर्षांवरील मुलाला लाभ घेता येतो.
पण, काही शेतकऱ्यांच्या नावावर २०१९ नंतर जमिनीची नोंद झाली आहे. तसेच पत्नीच्या नावावर माहेरी जमीन म्हणूनही काही दांपत्ये योजनेचा लाभ घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
नव्या नियमानुसार, पात्र लाभार्थ्याचे निधन झाल्यावर वारसा हक्काने जमिनीची नोंद झाली असेल तर पती किंवा पत्नीपैकी एकच व्यक्ती योजनेसाठी पात्र असेल. सरकारी किंवा निमसरकारी नोकरी नसेल आणि कर भरत नसेल तरच लाभ मिळणार आहे.
शेती संदर्भात या कारणामुळे शेतकरी ठरता आहेत अपात्र?
◼️ जमीन विक्रीमुळे भूमिहीन झालेले.
◼️ अगोदर कुटुंब प्रमुखास लाभ मिळत आहे.
◼️ संस्था मालकी असलेला जमीनधारक.
◼️ १ फेब्रुवारी २०१९ नंतरचा जमीनधारक.
◼️ जमिनीची मालकी स्वतःच्या नावे नसलेले.
◼️ शेती शिवाय इतर कारणासाठी वापरणारे जमीनधारक.
अधिक वाचा: शेतकऱ्यांसाठी 'ह्या' योजनेतून २५ हजार कोटींची तरतूद; लाभाचे पैसे थेट खात्यात जमा होणार