पनवेल : शेतीत विविध नावीन्यपूर्ण प्रयोग करणारे प्रगतशील शेतकरी मिनेश गाडगीळ यांनी यंदा व्हिएतनामस्थित ग्रीन राईसची यशस्वी लागवड केली. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाल्याने परिसरात कौतुक होत आहे.
पनवेल येथील कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी मीनेश गाडगीळ यांनी आतापर्यंत ब्लॅक बर्मा, लाल, नीळा, जांभळा अशा प्रकारच्या पिग्मेंटेड राईसची आपल्या शेतात लागवड केली आहे.
यावर्षी त्यांनी व्हिएतनाम व्हरायटीचा ग्रीन राईस आपल्या गुळसुंदे येथील शेतात लागवड केला आहे. या तांदळात क्लोरोफील कंटेंट जास्त असल्याने त्याला हिरवा रंग प्राप्त होतो.
शिवाय एक वेगळाच सुवास येतो. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. याशिवाय सरकारच्या वेगवेगळ्या योजनांतून अनुदानही दिले जाते.
१४० दिवसांत तयार होणारे वाण
◼️ साधारण १४० दिवसांत तयार होणारे हे वाण असून, एकरी १५०० किलोपर्यंत उत्पादन मिळते.
◼️ या प्रमाणेच त्यांनी थायलंडवरून जस्मीन राईस बियाणे आणले असून, प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली आहे व त्याचे पुढील वर्षासाठी बियाणे तयार करण्याचे काम सुरू आहे.
◼️ जस्मीन राईस हा सर्वात सुगंधी तांदूळ म्हणून गणला जातो. या तांदळालाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
तांदळात अॅन्टी ऑक्सिडन्ट इफेक्ट
◼️ तांदळाची ग्लॅयसेमिक इन्डेक्स कमी आहे, त्यामुळेच डायबेटिक पेशंट हा तांदूळ आपल्या आहारात घेऊ शकतात.
◼️ अॅन्टी ऑक्सिडन्ट इफेक्ट तांदळात आढळून येतो. शिवाय क्लोरोफील कंटेटमुळे शरीरातील टॉक्सिन न्युट्रल करण्याचा गुणधर्म तांदळात आहे.
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार वाण
पूर्वी रायगडमध्ये बथजीना कोलम नावाचे तांदळाचे पारंपरिक वाण होते, जे सध्या नामशेष झाले आहे. त्याचीही लागवड मीनेश गाडगीळ यांनी केलेली असून, पुढील हंगामात त्याचे बियाणे इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ते करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे इतर शेतक्यांनाही फायदा होणार आहे.
अधिक वाचा: वन्यप्राण्यांकडून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतात वाघोबा तर घरावर बिबट्या; जाणून घ्या सविस्तर