आयुब मुल्ला
खोची : शेतकऱ्यांसाठी क्षेत्रीय पातळीवर काम करणाऱ्या कृषी कर्मचाऱ्यांना लॅपटॉप मिळणार आहेत. त्यामुळे आता गावातच शेतकऱ्यांची ऑनलाइन कामे उरकण्याचे सोयीचे होणार आहे.
मंडळ किंवा तालुका कृषी कार्यालयात जाऊन ऑनलाइन माहिती भरण्याचा त्रास थांबणार आहे. कृषी विभाग अधिक अपडेट झाल्याची अनुभूती यामुळे मिळणार आहे.
कृषी विभागामार्फत विविध योजना, उपक्रम राबविले जातात. जवळपास प्रत्येक कामाला ऑनलाइनची जोड मिळाली असून, हा व्याप विस्तारत आहे.
ही कामे करण्यासाठी कृषी विभाग साधनाच्या कमतरतेमुळे वैतागून गेला होता. सहायक कृषी अधिकारी हा प्रत्येक गावात काम करणारा घटक आहे.
शेताच्या बांधावर जाऊन शासनाची ध्येयधोरणे, योजना, उपक्रम राबविण्याचे काम त्यांना करावे लागते. परंतु त्यांच्या हातात असलेल्या मोबाईलचा वापर करून ऑनलाइनची कामे करावी लागत असल्याने अडचण येत होती.
थेट मंडल किंवा तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालय गाठावे लागत होते. या कार्यालयात मोकळीक मिळाली तरच तेथे संगणक वापरायला दिले जात असे.
अन्यथा कृषी कर्मचाऱ्यांना ताटकळत बसावे लागत होते. त्यामुळे सहायक कृषी अधिकाऱ्यांच्या संघटनांनी लॅपटॉप मिळावा, अशी मागणी केली होती.
मे महिन्यात तर विविध मागण्यांसाठी कृषी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. सहायक कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी यांना कामासाठी संगणकीय साधनांची आवश्यकता असते.
१३ हजार २७५ कर्मचाऱ्यांना लाभ दिला जाणार
अखेर लॅपटॉप देण्याचा निर्णय घेत त्यासाठी लागणाऱ्या निधीची उपलब्धता झाली आहे. तरतूदही तत्काळ होणार आहे. कृषी विभाग राज्यातील १३ हजार २७५ कर्मचाऱ्यांना लॅपटॉप दिला जाणार आहे. यामुळे विविध संगणकीकृत योजनांचे कामकाज हाताळणे सुलभहोणार आहे.
विविध योजना, प्रकल्प आराखडे, महाडीबीटीवरील योजना, ऑनलाइन अर्जाची ऑनलाइन छाननी करणे, पीक नुकसान यादी तयार करणे अशी अनेक तांत्रिक कामे लॅपटॉपमुळे अचूक होण्यास मदत होणार आहे. - महादेव जाधव, सहायक कृषी अधिकारी
अधिक वाचा: तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक आहे का? हे ऑनलाईन कसे चेक कराल? वाचा सविस्तर
