मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नंदुरबार जिल्ह्यातील ९५३ बाधित शेतकऱ्यांना ६६ लाख ५७ हजार रुपयांच्या मदतीस मंजुरी देण्यात आली आहे. या मदतीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी आधार मिळणार आहे.
महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार मार्च-२०२६ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ९५३ शेतकरी या मदतीस पात्र ठरले असून ३७३.६७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान नोंदविण्यात आले आहे.
शासन निर्णयानुसार ही मदत डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. मदत वितरण करताना एका हंगामात एकदाच मदत देण्याचे निकष लागू राहणार असून लाभार्थ्यांची माहिती संबंधित यंत्रणांकडून संगणकीय प्रणालीवर अद्ययावत करण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही प्रकारची द्विरुक्ती होणार नाही याची दक्षता तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात येणार आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात वळता करू नये, अशा सूचनाही शासनाने संबंधित बँकांना देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
