माढा : तालुक्यातील आलेगाव येथील भैरवनाथ साखर कारखान्याची सन २०२४-२५ च्या ऊस गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 'एफआरपी'ची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांनी पुण्यातील साखर संकुल येथे आंदोलन करीत आक्रमक भूमिका घेतली.
मात्र, आंदोलन झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच ६३८ शेतकऱ्यांची ५ कोटी १० लाख २८० रुपये इतकी रक्कम टेंभुर्णीतील जयवंत मल्लिस्टेट बँकेत जमा करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
ऊस दर नियंत्रण समितीचे सदस्य प्रा. सुहास पाटील यांच्यासमवेत ४० ते ५० शेतकऱ्यांनी साखर आयुक्तालयात साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेत ६३८ शेतकऱ्यांची ऊस बिले दिलेली नसताना आरआरसी कारवाई पत्र देऊन का थांबवली? असा प्रश्न उपस्थित केला.
यावेळी आठवड्याच्या आत पैसे देण्याचे आश्वासन आयुक्तांकडून शेतकऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांना देत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
आंदोलन होताच शेतकरी घरी पोहोचायचा आत टेंभुर्णीतील जयवंत मल्लिस्टेट बँकेत जमा देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अधिक वाचा: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, पीक कर्ज मर्यादेमध्ये मोठे बदल; आता मिळणार वाढीव कर्ज?