पुणे : पावसामुळे मोसंबीच्या चांगल्या दर्जाच्या मालाचे प्रमाण घटले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्पादन सुमारे दहा टक्क्यांनी जास्त आहे. मात्र, १० ते २० टक्के फळांच्या दर्जावर परिणाम झाला असल्याने, बाजारात मोठ्या प्रमाणात मोसंबीची आवक वाढली आहे.
गुलटेकडी मार्केट यार्डातील फळ विभागात संभाजीनगर आणि नगर जिल्ह्यांतून दररोज ५० ते ७० टन मोसंबीची आवक होत आहे. गेल्या वर्षी याच काळात आवक ४० ते ५० टनांच्या दरम्यान होती.
गोवा, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव परिसरातूनही चांगली मागणी असल्याची माहिती अडतदार दासराव पाटील यांनी दिली.
घाऊक बाजारात उत्तम प्रतिची मोसंबी ४० ते ५० रुपये किलो दराने विकली जात असून, मध्यम प्रतीला २५ ते ३० रुपये किलो भाव मिळत आहे.
हलक्या दर्जाची मोसंबी १० ते २० रुपये किलो या दरात उपलब्ध आहे. किरकोळ बाजारात हा दर ४० ते ८० रुपये किलोपर्यंत जात आहे.
मोसंबीत मुबलक प्रमाणात असलेले जीवनसत्त्व क रोगप्रतिकारशक्ती वाढवते. आरोग्यासाठी ते फायदेशीर असल्याने रसवंती विक्रेते, स्टॉलधारक आणि घरगुती ग्राहकांकडून मोसंबीची मागणी कायम आहे.
मोसंबीचा आंबेबहारचा हंगाम सुरू आहे. हा हंगाम ऑगस्ट ते जानेवारीपर्यंत असतो सध्या आंबेबहारातील माल बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल होत असून, आकार, चव व गोडी उत्तम असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. - अरविंद मोरे, मार्केट यार्ड
यंदा जास्त पावसामुळे अनेक भागांत मोसंबीचा आकार, साल आणि रंगावर परिणाम झाला होता. प्रारंभी बाजारात आलेल्या मालात गोडी तुलनेने कमी जाणवत होती. मात्र, सध्या मोसंबी फळांची चव, रसाळपणा, गोडी आणखी वाढली असल्याने मागणी वाढली आहे. - डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, मार्केट यार्ड
अधिक वाचा: स्टांप ड्यूटी वाचविण्यासाठी पळवाट काढताय? वाचा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा 'हा' नवीन निर्णय
