शरद यादव
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या पुढाकाराने सुरू झालेला खुशाली-एन्ट्री विरोधी ग्रुपवर शेतकरी तक्रारी करू लागले आहेत, परंतु साखर कारखानदारांनी अद्याप कारवाईचा बडगा उगारला नसल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांनी कारवाई करण्याच्या सूचना देऊनही ऊस तोडीसाठी खंडणी सुरूच असल्याचे चित्र आहे.
ऊसतोडीसाठी तोडकरी पैसे घेत असल्याने आंदोलन अंकुश संघटनेने आवाज उठविला होता. मावळे यांनी यावर मार्ग काढत कारखान्याचे अधिकारी, शेतकरी संघटना व साखर सहसंचालक कार्यालयाचे प्रतिनिधी यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप केला. या ग्रुपवर शेतकरी तक्रारी करत आहेत.
तत्काळ कारवाईचे निर्देश मावळे यांनी देऊनही कारखाना प्रशासन ढिम्म आहे. ४५ तक्रारी आंदोलन अंकुश या संघटनेकडे केल्या आहेत. खुशाली, पाळी पत्रक याबाबत जास्त तक्रारी आहेत.
कारखान्यांनी कठोर व्हावे
शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी तोडीबाबत आमच्याकडे तक्रारी दिल्या आहेत. यातील काही विषय स्थानिक पातळीवर सोडवले आहेत. परंतु, पैसे परत देण्याबाबत कारखान्यांनी कठोर होण्याची गरज आहे, असे आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले.
उत्पन्न घटले पण खर्च वाढला
यंदा पावसाने ऊसाचे उत्पादन घटले आहे, पंरतु तोडीसाठीचा खर्च दुप्पट झाल्याचे चित्र आहे.
न सांगताच ऊस पेटविला
शिरढोण येथील शेतकऱ्याने आपल्याला न सांगता ऊस १ पेटवून तोडल्याचे, तसेच २५ गुंठ्यांसाठी अडीच हजार रुपये व चिटबॉयने ५०० रुपये घेतल्याची तक्रार केली आहे, तर कर्नाटकातील मशीन मालकाने एकरी ३ हजार घेतल्याचे शिरोळच्या शेतकऱ्याने सांगितले आहे.
शेतकऱ्यालाच धमकी
तेरवाड येथे एका शेतकऱ्याला तर तक्रार करतोस काय, तुझा ऊसच तोडत नाही, काय करायचे ते कर, अशी धमकीही देण्यात आली आहे. सांगलीच्या एका कारखान्याचा चिटबॉय पैसे घेतल्याशिवाय चिठ्ठीच देत नसल्याचा प्रकारही पुढे आला आहे.
उसतोडीसाठी पैसे घेतल्याच्या तक्रारी शिरोळ तालुक्यातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर दाखल झाल्या आहेत. याबाबत कठोर कारवाई करण्याचे आदेश कारखान्यांना दिले आहेत. - गोपाळ मावळे, सहसंचालक, प्रादेशिक साखर
मशीनने उस तोडीसाठी पैसे घेतल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत शहानिशा करण्याचे काम कारखाना प्रशासनाकडून सुरू आहे. दोषी आढळल्यास कारवाई करण्यास बांधील आहे. - किरण कांबळे, शेती अधिकारी, आवाडे-जवाहर साखर कारखाना