सोलापूर : आतापर्यंत जिल्ह्यातील ४ लाख ८० हजार ६८० शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीची रक्कम जमा झाली आहे.
ही रक्कम ५८४ कोटी रुपये असून, जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत. उर्वरित १ लाख शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणे बाकी आहे.
यातील ७० हजार शेतकऱ्यांची मंजुरी पूर्ण झाली असून, आठ दिवसांत रक्कमा जमा होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
प्रशासनाच्या आदेशानुसार तालुकानिहाय मंडळात पंचनामे करण्यात आले. एकूण ५ लाख ९२ हजार ८६९ शेतकऱ्यांपैकी ३६ हजार ७९२ शेतकरी अद्यापही ई-केवायसीविना अतिवृष्टीच्या रकमेपासून वंचित आहेत.
त्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. यासाठी कॅम्प सुरू असून, सर्व शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
नावात फरक, अकाउंट नंबरच चुकीचे
◼️ प्रशासनाकडे नोंद झालेल्या ५ लाख ९२ हजार ३६९ पैकी अनेकजण शेतकऱ्या नसल्याचे तपासणीदरम्यान निदर्शनास आले आहे.
◼️ अतिवृष्टीची ८० टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली आहे.
◼️ १ ते २ टक्के शेतकऱ्यांच्या नावामध्ये फरक असल्यामुळे त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेल्या नाहीत त्याही लवकरच जमा होतील.
◼️ काहीजणांच्या रक्कम तयार असूनही अकाउंट नंबर चुकीचा दिल्याने त्यांना पैसे मिळण्यास विलंब होत असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केले.
अधिक वाचा: उसातील सोयाबीनच्या आंतरपिकाने केला चमत्कार; ३२ गुंठ्यांत साडेसोळा क्विंटल अन् ९० हजारांची कमाई
