अलिबाग: कार्ले, खंडाळे, नेहुली, ताडगात आदी गातांमध्ये यंदा मोठ्या प्रमाणावर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे.
तालुक्यात सुमारे ३०० हेक्टर क्षेत्रावर कांद्याची शेती झाली आहे. भात कापणी पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये या कांद्याची लागवड झाली होती.
सध्या हा पांढरा कांदा पूर्णपणे तयार झाला असून, काढणीच्या कामाला वेग आला आहे. अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला परदेशातूनही मागणी वाढताना दिसत आहे.
सौदी अरेबियातून या कांद्याला मागणी आली असून एक कंटेनर कांदा निर्यातीसाठी मागतिल्याचे बोलले जात आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी हे रोजगाराचे महत्त्वाचे साधन ठरत आहे.
अनेक शेतकऱ्यांनी एक ते दोन एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली आहे, तर काही शेतकऱ्यांनी दोन ते तीन गुंठे इतक्या लहान क्षेत्रातही कांदा घेतला आहे.
काही कुटुंबांनी घराशेजारी परसबाग म्हणून कांद्याची लागवड करून स्वत:चा खर्च भागवण्यासोबत अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग निवडला आहे.
कांदा काढणीबरोबरच त्याचे सुकविणे आणि माळा तयार करण्यासाठी कामगारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत आहे.
जिल्ह्यासह मुंबई, पुण्याच्या व्यापाऱ्यांकडून खरेदी
◼️ सध्या शेतांमध्ये कांदा काढणीचे काम जोरात सुरू असून, काढलेला कांदा सुकवून त्याच्या माळी तयार करण्याचे काम समांतरपणे सुरू आहे.
◼️ अलिबागचा पांढरा कांदा चविष्ट, टिकाऊ आणि गुणधर्मयुक्त क्त असल्यामुळे त्याल राज्यातून मोठी मागणी असते.
◼️ रायगड स्थानिक बाजारपेठांबरोबरच मुंबई, पुणे आदी शहरांमधून व्यापारी कांद्याची खरेदी करत आहेत.
◼️ यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, योग्य दर मिळाल्यास पुढील हंगामात कांद्याच्या लागवडीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अधिक वाचा: शेतजमिनींच्या पोटहिश्श्यांच्या मालकी हक्काबाबतचे वाद आता मिटणार; सुरु होतोय 'हा' पथदर्शी प्रकल्प
